भाईंदर Dahisar toll naka :-दहिसर पथकर नाक्याजवळ उभारण्यात आलेली दुकाने, अवजड वाहने आणि बेकायदेशीर जाहिरातींवर कारवाई करून परिसर मोकळा करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

अरुंद रस्ते आणि प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक तीव्र झाल्यामुळे सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा या पथकर नाक्याचा पाहणी दौरा केला.

यावेळी मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते. या प्रसंगी पथकर नाक्याजवळील मार्गांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या वीसहुन अधिक दुकानांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे दिले. तसेच या भागातील अनधिकृत जाहिरातफलकांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही सूचित केले. याशिवाय रस्त्याच्या कडेला विविध कामांसाठी उभे राहणाऱ्या क्रेन व डंपरवर कारवाई करून हा परिसर मोकळा ठेवावा, जेणेकरून वाहनांना पुरेशी वाट उपलब्ध राहील, असे सरनाईक यांनी सांगितले.

स्थलांतराबाबत ठोस निर्णय नाही दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा पथकर नाका वर्सोवा येथे उभारण्यास वनमंत्री गणेश नाईक यांनी नकार दिल्यामुळे शासन स्तरावर संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हा पथकर नाका पुढे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. मात्र, यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्यामुळे जुन्या पथकर नाक्यावरील कोंडी दूर करण्याकडे परिवहन मंत्र्यांनी आपला मोर्चा वळवला आहे.