विरार : Virar Suicide Case विरार पश्चिमेच्या ओलांडा परिसरातील एका इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री दहा च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विरार पश्चिमेला आगाशी अर्नाळा रस्त्यावरील ओलांडा परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. सोमवारी रात्री दोन विद्यार्थ्यांनी या इमारतीवरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या दोन तरुणांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र ही आत्महत्या असल्यास आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. हे दोन तरुण नालासोपारा येथून आगाशी परिसरात नेमके कोणत्या कारणासाठी आले होते याबाबत अजून कोणतीही माहिती मिळलेली नाही. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत.
अशी पटली मृतांची ओळख….
मृत तरूणांकडे मोबाईल फोन नसल्याने त्यांनी ओळख पटविण्यात पोलिसांसमोर अडचणी येत होत्या. हे दोन विद्यार्थी ज्या दुचाकीवरून आले होते त्या दुचाकीवर असणाऱ्या क्रमांक पट्टीच्या आधारे पोलिसांनी माहिती घेतली. या माहितीच्या आधारे हे दोन तरुण नालासोपाऱ्याच्या आचोळे येथील रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले. त्यांच्या कुटुंबियांशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. श्याम सनद घोरई (२०) आणि आदित्य रामसिंग (२१ ) अशी तरुणांची नावे असून ते दोघेही नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात शिक्षण घेत होते. अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.
या घटनेमुळे शहरातील बंद इमारती तसेच बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला आहे. अनेकदा अशा इमारतींच्या परिसरात सुरक्षारक्षकाचा अभाव असतो. अशा इमारतींमध्ये अनेकदा मद्यपी आपला अड्डा तयार करतात. यामुळे शहरातील बंद इमारती. धोकादायक इमारती आणि नव्याने बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या परिसरात सुरक्षा नियमांचे पालन होते आहे किंवा नाही याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.