वसई: सोमवारी सकाळी वसईत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत अनियंत्रित डंपरने दिलेल्या धडकेत दोन मजूर महिलांचा मृत्यू झाला. तर महामार्गावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी सकाळी वसई पूर्वेच्या सातिवली खिंडीजवळ कामावर जाण्यासाठी काही मजूर महिला उभ्या होत्या. ११ च्या सुमारास महामार्गावरून एक डंपर भरधाव वेगाने येत होता. त्या डंपरचालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने दोन महिलांना ठोकले. हा अपघात प्रचंड भीषण होता. यातील एक महिला डंपरखाली आली तर दूसरी महिला दूरवर फेकली गेली आणि तिथून जाणार्‍या बसच्या खाली आली. दोघींचा जागीच मृत्यू झाला.
रंजिता सरोज (३३) आणि बिंदादेवी सिंग (५०) असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या महिलांची नावे आहे. या डंपरने पुढे एका ट्रकला धडक दिली आणि तेव्हा तो थांबला. जर तो ट्रक नसता तर डंपरने आणखी महिलांना चिरडले असते असे पोलिसांनी सांगितले. वालीव पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे.

हेही वाचा – मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी नागरिकांचे हाल

हेही वाचा – वसई : इमारतीच्या आवारात विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत सोमवारी सकाळी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रॉयल गार्डन ( मालजी पाडा ) येथे डंपरने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.