वसई: वसई पूर्वेच्या गोखीवरे- रेंज नाका परीसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. ही समस्या दूर करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली वन विभागाची चौकी व मोठे वृक्ष स्थलांतरीत करण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच येथील परिसर कोंडीमुक्त होणार आहे.
वसई पूर्वेच्या भागात गोखीवरे रेंज नाका परिसर आहे. याच भागातून वसई विरार शहर व मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे मुख्य रस्ते गेले आहेत. शहराच्या दृष्टीने दळणवळण करण्याचे मुख्य रस्ते असल्याने येथून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. मागील काही वर्षात वसईसह रेंज नाका, वालीव, सातीवली, भोयदापाडा या भागातील नागरीकरण व औद्योगिक क्षेत्र ही विस्तारले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. याच फटका नोकरदार वर्ग, सर्वसामान्य प्रवासी,शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवेला अधिकच बसत असतो.
रेंज नाका परिसरात तीन रस्ते एकत्रित येतात. मात्र दोन्ही बाजूने रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. वाहतूक नियंत्रणात राहावी यासाठी पालिकेने सिग्नल यंत्रणा ही बसविली आहे.तरीही कोंडी नियंत्रणात येत नाही. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळ अशा वेळी तर जास्तच कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेली वनविभाग चौकी व मोठी झालेली वृक्ष ही अडसर येत आहेत. या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी अशी मागणी सातत्याने नागरिक करीत आहेत.
सोमवारी पालघर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक व बोईसरचे आमदार विलास तरे यांनी रेंज नाका वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित करून येथील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कोंडीतून सुटका व्हावी यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली वनविभागाची चौकी जर बाजूला केली तर ये जा करण्यास रस्त्याची रुंदी वाढेल असे आमदार राजन नाईक यांनी सांगितले तर जी मोठी वृक्ष आहेत ती सुद्धा अगदी रस्त्याला लागूनच आहे ती हटविण्यात यावे असे आमदार विलास तरे यांनी बैठकीत सांगितले. त्याला उत्तर देताना वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की सदर ठिकाणांची पाहणी करून त्याची पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात यावी असे निर्देश खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे रेंज नाका परिसर लवकरच कोंडी मुक्त होणार आहे.
उड्डाणपुलाचा प्रस्ताव
वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी सात उड्डाणपूल उभारण्यात यावे यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात रेंज नाका येथील उड्डाणपुलाचाही समावेश आहे. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या बैठकीत ही या पुलांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी ही या पुलाच्या कामाच्या प्रक्रियेला गती द्यावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.