वसई:- ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन अधिकच धोकादायक ठरू लागले आहे. या गेम मध्ये पैसे हरल्यानंतर नैराश्यात जाऊन आत्महत्या करण्याच्या घटना ही समोर येत आहेत. मंगळवारी ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरल्याने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रदीप जैस्वाल (४०) असे या व्यक्तीचे नाव आहे.ऑनलाइन जुगारात पैसे हारल्याने आलेल्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रदीप जैस्वार हा घोडबंदर रोड येथील बामनोली पाडा येथे राहत होता. त्याला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. त्या ऑनलाइन गेम मध्ये हरल्याने त्यांनी ऑनलाइन स्वरूपात मिळणारे कर्ज ही घेतले होते.

मात्र कर्ज कसे फेडायचे या विचाराने तो नैराश्यात होता. याच नैराश्यातून मंगळवारी सायंकाळी त्यांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वर्सोवा पुलावरून खाली उडी मारली यात त्याच्या डोक्याला गंभीर दुःखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.