वसई: दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये चिनी आणि प्लॅस्टिकच्या कंदिलांचा बोलबाला असताना, मिरा भाईंदरमध्ये मात्र पारंपरिक कला आणि पर्यावरणाची जाणीव याचा अनोखा मेळ मातीचे कंदील उपलब्ध झाले आहेत. बाजारात उपलब्ध असणारे मातीचे आकाश कंदील केवळ आकर्षकच नाहीत, तर पूर्णपणे पर्यावरणपूरक असल्यामुळे ग्राहकांची त्याला विशेष पसंती मिळत आहे.
वसई विरारमध्ये दिवाळीचे वातावरण निर्माण झाले असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू आहे. घराला सणाची शोभा आणणाऱ्या वस्तूंच्या गर्दीत, रंगीबेरंगी आकाश कंदिलांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. मात्र, या कंदिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक आणि कागदी वस्तूंपासून बनवलेल्या, पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या कंदिलांचा समावेश असतो.
पण, मिरा भाईंदरच्या बाजारपेठांमध्ये मात्र मातीचे, नक्षीदार कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. भाईंदर पूर्वेतील गोल्डन नेस्ट परिसरातील विक्रेत्यांकडे हे कंदील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. कोलकत्याहून मागवण्यात आलेले हे कंदील पूर्णपणे मातीपासून बनवण्यात आले असून त्यांच्यावर सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. तसेच हे कंदील सहजपणे घराबाहेर किंवा बाल्कनीत टांगता येतील अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत.
मिरा भाईंदरच्या बाजारपेठेत मातीच्या गोल कांदिलांव्यतिरिक्त खोल घुमट असणारे, झुंबरासारखे तसेच मातीच्या घुंगरूनी सजवलेले, पानाफुलांसह विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले, वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे कंदील अगदी ३४० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
मातीच्या कंदिलांमुळे स्थानिक कारागिरांना रोजगार
दिवाळीच्या जवळपास दोन ते तीन महिने अगोदर कोलकात्याच्या कारागिरांकडून कंदील बनवायला सुरुवात केली जाते. माती भिजवून- तुडवून तिच्यापासून वेगवेगळ्या आकाराचे कंदील घडवले जातात आणि त्यानंतर त्यांच्यावर कारागीर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम करतात. जवळपास आठवडा ते पंधरा दिवसांच्या मेहनतीनंतर हे कंदील तयार केले जातात. या नाविन्यपूर्ण कंदीलांमुळे स्थानिक कलेला वाव मिळत असून पारंपारिक कला जपणाऱ्या कारागिरांनासुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
नाविन्यपूर्ण कंदीलांना ग्राहकांची पसंती
दिवाळीत केल्या जाणाऱ्या इतर सजावटीपेक्षा घराबाहेर लागणारा कंदील दिवाळीच्या सजावटीत वेगळेच चैतन्य घेऊन येतो. त्यामुळे दरवर्षी ग्राहक नाविन्यपूर्ण कंदिलांच्या शोधात असतात. यावर्षी आमच्याकडे उपलब्ध असणारे हे मातीचे कंदील केवळ आकर्षकच नसून पर्यावरणपूरक देखील आहेत. तसेच हे कंदील परवडण्याजोगे असल्यामुळे ग्राहकांकडून या कंदीलांना मोठी मागणी असल्याचे विक्रेते श्रवण कुमार यांनी सांगितले.