वसई: नायगाव मधील एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी अश्लील नृत्य सादर करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात मंडळाच्या आयोजकांसह ८ जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई विरार शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव ही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात असतात. मात्र वसई पूर्वेतील चिंचोटी परिसरातील श्री बजरंग मित्र मंडळाच्या मंडपात तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून अश्लील नृत्य करवून घेतल्याचा प्रकार समोर आला होता. मेरी चहल जवानी रसगुल्ला या भोजपुरी गाण्यावर ६ तृतीय पंथीय अश्लील आणि बिभत्स नृत्य करत होते. गणपती समोरच असा बिभत्स प्रकार सुरू असताना आयोजक त्यांना अटकाव न करता प्रोत्साहन देत होते.
या कार्यक्रमाला असंख्य नागरिक उपस्थित होते.या नृत्याची चित्रफित समाज माध्यमावर ही प्रसारित करण्यात झाल्यानंतर सर्वत्र संताप पसरला होता. गणेशोत्सवासारख्या पवित्र सणाचे पावित्र्य भंग करणाऱ्या या कृतीचा नेटकऱ्यांनी निषेध केला आहे. उत्सवाच्या नावाखाली असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मंडळांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत होती.
अखेर नायगाव पोलिसांनी मंडळाचे कार्यकर्ते संजयकुमार साहू (३५), मुरारी जयशंकर मिश्रा (५५) यांच्यासह ६ तृतीयपंथी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे