वसई : समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून भरधाव वेगाने वाहने चालविणे व हुल्लड बाजी करणे असे प्रकार सुरूच असतात. रविवारी वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. किनाऱ्यावर तयार केलेला चौथरा तोडून ही कार खाली कोसळली आहे.

वसई पश्चिमेच्या भागात राजोडी समुद्र किनारा आहे. या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक हे पर्यटनासाठी येत असतात. विशेषतः विकेंडला या किनाऱ्यार पर्यटकांची मोठी गर्दी असते. परंतु काही समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या काही पर्यटकांमार्फत मद्यपान करून हुल्लडबाजी केली जात असते. या हुल्लबाजीमुळे याचा फटका या ठिकाणी मौज मज्जा करणाऱ्या पर्यटकांना बसत असतो.

तर काही पर्यटक हे थेट वाहने घेऊन समुद्र किनाऱ्यावर जातात असतात. तर काही जण स्टंटबाजी सुद्धा करीत असतात अशा प्रकारामुळे गाड्या समुद्रात  अडकून पडल्याच्या व किनाऱ्यावर अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही वाहन चालक किनाऱ्या लगतच्या भागातही उत्साहाच्या भरात वेगात चालवित असतात त्यामुळे अपघाताच्या घटना समोर येतात.

रविवारी सुद्धा अशाच प्रकारे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा भीषण अपघात घडला. ही कार लावण्यात आलेले बॅरिगेट तोडून थेट खाली उलटली. यात वाहनचालक जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.सद्यस्थितीत या घडलेल्या अपघाताची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.

या घडलेल्या घटनेनंतर पर्यटकांकडून ही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एखाद्याचा अतिहौशी पणा अन्य पर्यटकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. जे स्टंट बाजी करून व बेदरकारपणे वाहने चालवीत असतील अशा वाहन चालकांवर प्रशासनाने नियंत्रण मिळवावे अशी मागणी करण्यात येत आहे.