वसई: तू खालच्या जातीची आहेस असे सांगून लग्नास नकार दिल्याने वसईतील २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. रेवती उमेश निळे असे या तरुणीचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी तिचा प्रियकर आयुष राणा आणि त्याचे वडील अजय राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रेवती निळे (२०) ही तरूणी वसई पश्चिमेच्या भास्करआळी श्रीनगर परिसरात राहत होती. तिने नैराश्यातून २७ एप्रिल रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. रेवतीचे तिच्याच महाविद्यालया शिकणाऱ्या आयुष राणा याच्यासोबत माही चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तसेच लग्नाच आमिष दाखवून त्याने अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.
मात्र लग्नाच्या विषयावेळी मुलाचे वडिल अजय राणा (५१) यांनी देखील रेवतीला तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग असल्याचे कारण देत हे लग्न होऊ शकणार नाही असे कारण दिले.याशिवाय तू खालच्या जातीची आहे असं कारण देत लग्नाला नकार दिला. त्यामुळे नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात प्रियकर व त्याचे वडील दोघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर दोघेही फरार असून त्यांचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तात्या सावंत यांनी सांगितले आहे.
फसवणूक केल्याचा आरोप
आयुषचे वडील अजय राणा हे तांत्रिक आहे. ते रेवतीवर विविध धार्मिक विधी करीत होते. तिच्या हाताला बांधण्यासाठी काळा दोराही दिला होता. याशिवाय अनेकदा तिच्या बॅगेत ठेवण्यासाठी राख देत होते. असे केल्याने तुझ्यातील दोष दूर होतील आणि तुझे लग्न लावून देता येईल असे राणा यांनी सांगून फसवणूक केली असल्याचा आरोप रेवतीचा भाऊ दिनेश काळे यांनी केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.