वसई:- मुंबई अहमदाबाद महामार्गालगत वसई विरारच्या आडगावांमध्ये मोठ्या प्रमाणावर फोफावू लागलेल्या अमली पदार्थांच्या केंद्राचं उच्चाटन करण्यासाठी आता स्थानिक महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. अमली पदार्थांचे हे कारखाने या भागात मोठ्या प्रमाणावर फोफावलेल्या बेकायदा बांधकामामध्ये मूळ धरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे लक्षात घेऊन या बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.
वसई विरार शहरात व शहराला लागूनच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. विशेषतः औद्योगिक कारखाने त्यात बसविण्याच्या दृष्टीने ही बांधकामे केली जात आहेत. मात्र काही ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या गाळ्यात व शेड मध्ये रासायनिक कारखाने व अन्य कारखान्यांच्या नावाखाली अमली पदार्थांची निर्मिती करणारे कारखाने चालविले जात आहेत. नुकताच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या नालासोपारा पेल्हार परिसरातील रशीद कंपाऊंड मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकून एका रासायनिक कारखान्याच्या नावाखाली चालणाऱ्या एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या युनिटचा पर्दाफाश करत १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. सदरचा कारखाना हा अनधिकृत पणे उभारण्यात आलेल्या गाळ्यात सुरू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाई वरून स्पष्ट झाले आहे.
अनधिकृत होत असलेल्या बांधकामांचा वापर हा अमली पदार्थ कारखाने चालविण्यासाठी केला जात असल्याने ते अत्यंत धोकादायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया ही नागरिकांमधून उमटत होती.
आता पालिकेनेही अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहीम अधिक तीव्र करून महामार्गालगत व शहरांतर्गत उभी राहणारी अनधिकृत बांधकामे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. अनधिकृत बांधकाम कारवाईच्या संदर्भात नुकताच बैठक ही पार पडली असून त्याबाबतचा आराखडा तयार करून पोलीस व महापालिका अधिकारी यांच्या मार्फत संयुक्त कारवाई केली जाईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.
पेल्हार येथील कारवाईसाठी पत्र
मुंबई पोलिसांनी नुकताच नालासोपारा पेल्हार येथील राशीद कंपाऊंड मध्ये अमली पदार्थाच्या कारखान्यावर कारवाई केली होती. तो कारखाना अनधिकृत बांधकाम असलेल्या गाळ्यात उभारण्यात आला होता. याबाबत पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्याची पाहणी केली होती. मात्र ही जागा वनविभागाची असल्याने त्यांनी त्यावर कारवाई करावी असे पत्र महापालिकेने वनविभागाला पाठविले आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ ही उपलब्ध करून दिले जाईल असे पालिकेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
व्यसन मुक्ती केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न
मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात तरुणाई ही अमली पदार्थांच्या आहारी जाऊन व्यसनाधीन बनली आहे. विशेषतः शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे प्रकार आढळून येत आहेत. अमली पदार्थांच्या व्यसनांपासून तरुणाईने दूर राहावे यासाठी महापालिका व्यसनमुक्ती केंद्र तयार करण्याच्या अनुषंगाने ही प्रयत्न करीत असल्याचे महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
अनधिकृत बांधकामांची कारवाईची मोहीम सुरूच आहे. आता पुन्हा एकदा बैठक घेतली असून जी नव्याने बांधकामे उभी राहत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.तशा सूचना ही अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. – मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका
