वसई:वसई विरार महापालिकेच्या नियोजनशून्य आणि असंवेदनशील कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने वसईतील एका स्मशानभूमीतच चक्क खेळण्याचे आणि व्यायामाचे साहित्य बसवले आहे. स्मशान ही दु:खाची जागा मानली जाते. अशा ठिकाणी मनोरजनांची साधने लावून पालिकेने नागरिकांच्या भावनांशी खेळ केल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
वसई विरार महापालिकेत मागील ५ वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे अधिकारी कुणालाही विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने कामे करत असतात. त्यात कसल्याची प्रकारचे नियोजन नसल्याने केवळ पैशांची उधळपट्टी होत असते. पंरतु पालिकेने यावेळी केलेल्या एका कामामुळे वसईतील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वसई पश्चिमेच्या प्रभाग समिती ‘आय’ (वसई गाव) अंतर्गत असलेल्या बेणापट्टी भागात एक हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे. पालिकेने या स्मशानभूमीची दुरवस्था दूर करण्याऐवजी चक्क या स्मशानातच खेळण्याचे आणि मनोरंजनाचे साहित्य लावले आहे. वेगवेगळ्या प्रकारची १५ हून अधिक साहित्य लावण्यात आली आहेत. त्यात झोपाळा, घसरगुंडी आदी साहित्यांचा समावेश आहे. यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
इथे जवळच खेळाचे मैदान आहे. मात्र तरीही पालिकेने खेळाचे आणि व्यायामाचे साहित्य स्मशानभूमीत आणून बसविले आहे. स्मशानभूमी परिसरात लहान मुले आणि महिला येत नाहीत याचेही भान पालिकेला नाही, असे स्थानिकांनी म्हटले आहे. उद्या या स्मशानात अंत्यविधी होत असतात लहान मुले अशा वातावरणात इथे कशी खेळणार असा संतप्त सवालही स्थानिकांनी केला आहे.पालिकेच्या उपायुक्ता (उद्यान) स्वाती देशपांडे यांनी मात्र हा प्रकार चुकीचा असल्याची कबुली दिली. यासंपूर्ण प्रकऱणाची माहिती घेऊन कारवाई केली जाईल तसेच स्मशानभूमीत लावलेले साहित्य काढण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
पालिकेचे डोके ठिकाणावर आहे का?
माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्मशानभूमी ही दु:खाची जागा आहे. इथे येणारी लोकं शोकमग्न अवस्थेत असतात. त्यांच्या समोर करणमुकीची साधने म्हणजे त्यांच्या भावनांशी खेळ आहे. मुले मैदानात, उद्यानात खेळतात. स्मशानभूमीत मुले खेळतील हा पालिका तर्क अजब आहे. अधिकार्यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते असे ते म्हणाले. पालिकेने त्वरीत ही खेळणी हटवावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. ही केवळ पैशांची उधळपट्टी आणि भ्रष्टाचाराचे माध्यम असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अभियंत्याच्या बेजबाबदारपणा..
पालिकेचे कनिष्ठ अभियंता अतुल मेसे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी बेजबाबदार उत्तर दिलं. सर्वच ठिकाणी साहित्य लावलण्यात आली आहेत. स्मशानभूमीत काय साहित्य लावले आहेत त्याची माहिती पालिकेत येऊन घ्या असे त्यांनी रुक्षपणे सांगतिले. चूक मान्य करण्याऐवजी त्याचेच समर्थन करण्याची वृत्ती दिसून आली.