VVMC Marathon 2025 update :वसई विरार महापालिकेची डिसेंबर महिन्यात होणारी १३ वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुक प्रक्रिया संपल्यानंतर पुन्हा मॅरेथॉन घेतली जाईल असे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.वसई विरार महापालिकेकडून दरवर्षी  डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाते. २०११ पासून या मॅरेथॉन स्पर्धेची सुरवात पालिकेने केली होती.आतापर्यंत पालिकेच्या १२ मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या आहेत.

या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास पंधरा हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होत असतात. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, पुणे यासह इतर राज्यातील नामवंत धावपट्टू ही या स्पर्धेत उत्साहात सहभागी होत असतात. ४२ किमी ची पुर्ण मॅरेथॉन, २१ किमी अर्धमॅरेथॉन अशा मॅरेथॉनसह बॅटल रन, धम्माल धाव, व्हील चेअर रन अशा विविध स्पर्धा पार पडतात. तर दुसरीकडे ऑलम्पिक विजेते, सिनेकलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवर ही या स्पर्धेला हजेरी लावतात. त्यामुळे य मॅरेथॉनची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष ते राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पाच मॅरेथॉन मध्ये वसई विरारचा समावेश आहे.

यंदा महापालिकेची ७ डिसेंबरला १३ वी मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार होती. त्यानूसार पालिकेने बैठक घेत मॅरेथॉन स्पर्धेची घोषणा ही केली होती. मात्र आता आगामी महापालिका निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे.या निवडणुकीमुळे यावर्षी होणारी १३ वी  राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

३१ जानेवारीच्या आत निवडणूका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेतील अडचणी, विविध आवश्यक परवानग्या, प्रशासकीय मर्यादा यांचा विचार करून ही मॅरेथॉन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक झाल्यानंतर योग्य वेळी पुन्हा मोठ्या उत्साहाने ही मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.

भारतातील पाच राष्ट्रीय मॅरेथॉन पैकी वसई विरारची एक मॅरेथॉन आहे. तीच मॅरेथॉन रद्द होते हे दुर्दैव आहे. वसई विरार सारखी मॅरेथॉन अन्य कुठे नसते अशा प्रतिक्रिया धावपटूंच्या असतात. याशिवाय मॅरेथॉनमुळे शहराचे नाव ही देश भरात जात आहे तीच बंद झाली तर खेळाडू नाराज होतील अशी प्रतिक्रिया माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.

स्पर्धक व क्रीडा प्रेमीं नाराज

वसई विरार महापालिकेने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असतात.  विशेषतः काही खेळाडू हे सामाजिक संदेश घेऊन मॅरेथॉन धावत असतात.तर धावणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी क्रीडा प्रेमीं सुद्धा रस्त्यावर उतरतात. मागील काही वर्षांपासून मोठया उत्साहात पार पडणारी मॅरेथॉन स्पर्धा  यंदा रद्द करण्यात आल्याने धावपट्टू व क्रीडा प्रेमींचा हिरमोड झाला आहे.

यापूर्वी ही झाली होती मॅरेथॉन रद्द

२०२० मध्ये वसई विरार शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला होता.  नागरी सुरक्षेच्या दृष्टीने गर्दी करण्यास शासनाने बंदी घातली होती. या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये ही महापालिकेची राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

निवडणूक असल्याने ७ डिसेंबरला मॅरेथॉन घेणे शक्य नाही. त्याचे नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. यासाठी ही  मॅरेथॉन पुढे ढकलण्यात येणार आहे.-मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका