विरार : शहरात नवरात्री उत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यात आयोजक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे, शहरातील प्रसिद्ध देवस्थाने यांचा समावेश आहे. वसई विरार मध्ये जीवदानी मंदिर, चंडिका माता मंदिर, सोनूबाई भवानी मंदिर यासह इतर प्रसिद्ध देवस्थाने असल्याने विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात तर दुसरीकडे नवरात्री निमित्ताने अनेक भागात गरबा नृत्याचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. मात्र उत्सव साजरा होत असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहे.
रस्त्यावर मंडप घालताना वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी घेणे, गाणी वाजवताना आवाज मर्यादेचे पालन करणे, उत्सव साजरा करताना रीतसर परवानगी घेणे, उत्सव साजरा करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेणे अशा सर्व सूचना पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. मंडळांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे पोलिसांनी सांगितले आहे. नुकताच नायगाव पोलिसांनीही नवरात्रीनिमित्ताने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी शांततेत व नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा अशा सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी दिल्या आहेत. तसेच पोलीस ठाण्यातही अशा प्रकारच्या बैठका सुरू आहेत.