वसई: वसई विरार मधील स्कायवॉक सध्या व्यसनी, मद्यपी आणि गर्दुल्यांचा अड्डा होताना दिसत आहे. अशा गर्दुल्ल्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी स्कायवॉकवर गस्त घालत कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

वसई आणि विरार स्थानकाजवळ कोट्यावधी रुपये खर्चून ‘एमएमआरडीए’ने स्कायवॉक बांधले आहेत. दररोज अनेक नागरिक या स्कायवॉकचा वापर करतात. पण गेल्या काही काळात स्कायवॉकवर व्यसनी, मद्यपी आणि गर्दुल्यांच्या वाढत चाललेल्या वावरामुळे नागरिकांना स्कायवॉकवरून प्रवास करणे धोक्याचे ठरू लागले आहे.

गर्दुल्यांवर कारवाई केली जात नसल्याने नागरिकांकडून होणारा स्कायवॉकचा वापर कमी होताना दिसत आहेत. याचा फायदा घेत गर्दुल्यांनी स्कायवॉकवर आपले बस्तान मांडायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी थेट घर थाटले असून स्कायवॉकवर कपडे वाळत घातले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्कायवॉक वर लक्ष देण्यासाठी कोणीच नसल्याने याठिकाणी गर्दुल्ले, भिकारी, व्यसनाधीन यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असल्याने विशेष करून महिलांना येथून प्रवास करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत यासाठी याकडे लक्ष देऊन गर्दुल्ले वावरत आहेत त्यांना पायबंद घालावा अशी मागणी प्रवाशांनी केली होती. तसेच याबाबत दैनिक लोकसत्ताने वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विरार पूर्व आणि पश्चिम स्कायवॉकवर पोलिसांची गस्त आणि पाळत वाढवण्यात आली आहे.