वसई: वसईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी वसई पश्चिमेच्या चुळणे गावात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. विशेषतः ये जा करण्याच्या चारही मुख्य मार्गातच पाणी साचून असल्याने चुळणे गावातील रहिवाशांची जलकोंडी झाली आहे.

वसई पश्चिमेतील भागात चुळणे गाव परिसर आहे. या भागात मोठ्या संख्येने नागरिकांची वस्ती आहे. मात्र चुळणे परिसर हा सखल भागात असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की गावाचा परिसर पाण्याखाली जातो. वसई विरार शहरात मागील पाच दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला होता. याच फटका पुन्हा एकदा चुळणे परिसराला बसला आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

गावात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी येथील नागरिक पालिका प्रशासनाकडे यावर कायमची उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र गावकऱ्यांच्या मागणीकडे आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात नसल्याने गावकऱ्यांवर पाण्यात राहण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

पाणी साचून राहिल्याने गावात ये जा करण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागत आहे. पाच दिवसांपासून कोसळणारा पाऊस आता थांबला असला तरीही गावात पाणी साचून राहिले आहे. चुळणे- माणिकपूर, चुळणे- सांडोर, चुळणे- बाभोळा, चुळणे-सनसिटी असे गावाला जोडणारे रस्तेही पाण्याखाली गेले असल्याने ये जा करण्यास अडचणी येतात असे जागृती सेवा संस्थेचे जॅक गोम्स यांनी सांगितले आहे मागील वीस वर्षोपासून आम्ही हे सहन करीत आहोत.

ही पूरस्थिती मानवनिर्मित आहे असेही गोम्स यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील शहरातील नागरिकांची हिच परिस्थिती असेल तर पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तकलादू असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.