पुलाला तडे, संरचनाही चुकीची असल्याचा खासदारांचा आरोप

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुहास बिऱ्हाडे

वसई :  भाईंदर खाडीवरील बांधकाम सुरू असलेल्या नवीन वर्सोवा पुलाला तडे गेल्याचे आढळून आले आहे. पुलाच्या गर्डरची रचना कमकुवत असल्याने पूल धोकादायक बनल्याचा आरोप पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केला. बुधवारी त्यांनी बांधकामस्थळीच अधिकाऱ्यांना पुलाच्या कामातील दोष दाखवून दिले. यावर अधिकाऱ्यांनी आवश्यक तो बदल करण्याचे आश्वासन दिले आहे.

भाईंदर खाडीवर वाहनांसाठी मुंबई आणि गुजरातला जोडणारा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे तयार करण्यात येत आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. तसेच पुलाची संरचना सदोष असल्याचा आरोप खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. या पुलाच्या पाहणीसाठी त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक पोलिसांना घेऊन पुलाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. गावित यांच्या खासगी वास्तुविशारदांनी पुलाच्या कामातील दोष दाखवून दिले. पूलाचे बांधकाम झाल्यानंतर त्याला गर्डर टाकण्यात येत आहे. त्यामुळे पूल कमकुवत होणार असून तो सुरू झाल्यावर वाहनांचा भार सहन करू शकणार नाही असे वास्तुविशारदांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र नाशिकच्या धर्तीवर या पुलाचे काम सुरू असून नंतर गर्डर बसविल्याने पूल कमकुवत होणार नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. तरीदेखील तज्ज्ञामार्फत तपासणी करून योग्य तो बदल केला जाईल असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार सारंग चपळगावकर यांनी दिले.

आयुष्यमानावरून खासदारांचा संताप

भाईंदर खाडीवर पहिला पूल १९६८ मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल आताच कमकुवत झाला आहे. त्यामुळे नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहे. या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आली होती. या नवीन पुलाचे आयुष्यमान फक्त ५० वर्षे असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मुकुंदा अत्तरदे यांनी दिली. ते ऐकून खासदार राजेंद्र गावित हे संतापले. ब्रिटिशांनी बांधलेला पूल दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतो. एवढा खर्च करून हा पूल फक्त ५० वर्षांसाठी का बांधला? या नवीन पुलाचे आयुष्यमान किमान १०० वर्षे तरी असायला हवे होते, असे त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

पहिला टप्पा फेब्रुवारीला तर दुसरा मेमध्ये

फेब्रुवारी २०२१ रोजी या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र सुरुवातीला या पुलाचे काम अगदी संथ गतीने सुरू होते. त्यामुळे या कामाला ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढही  देण्यात आली होती. त्यातच दोन वर्षे करोनाचे संकट उद्भवले आणि या पुलाचे काम आणखीनच लांबणीवर पडले होते. या नवीन पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम फेब्रुवारी अखेपर्यंत पूर्ण होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात मुंबई ते सुरत आणि ठाणे ते सुरत ही मार्गिका सुरू केली जाणार आहे. सुरत ते मुंबईसाठी मात्र मेपर्यंत वाट बघावी लागणार आहे, अशी माहिती प्रकल्प संचाकल मुंकुंदा अत्तरदे यांनी दिली.

या पुलाला तडे पडल्याचे आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पुलाच्या गर्डरची रचना चुकीची आहे. त्यामुळे पूल कमकुवत होणार आहे. त्यावर भविष्यात अपघाताचाही धोका आहे. पुलाचे आयुष्यमानदेखील केवळ ५० वर्षांचे आहे. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. 

– राजेंद्र गावित-खासदार पालघर

ज्या ठिकाणी तडे पडले आहेत त्याची दुरुस्ती केली जाईल. मात्र पुलाच्या गर्डरच्या रचनेत दोष नाही. तरीदेखील तज्ज्ञ अभियंत्याच्या मार्फत पुलाची पाहणी करून आवश्यक तो बदल केला जाईल. 

– मुकुंदा अत्तरदे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Versova bridge dangerous mps allege that the structure is also wrong ysh