विरार : विरार पश्चिमेच्या प्रसिद्ध अर्नाळा किल्ला आणि अर्नाळा गावाची रक्षणकर्ती मानल्या जाणाऱ्या किल्ल्यातील कालिका देवी मंदिरात भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. यानिमित्ताने समुद्रकिनाऱ्याचा परिसर सध्या भक्तिमय वातावरणात न्हाहून निघाल्याचे दिसत आहे.
विरार पश्चिमेला प्रसिद्ध जंजिरे अर्नाळा किल्ल्याच्या परिसर आहे. हा किल्ला समुद्रातील बेटावर असून इथे जाण्यासाठी बोटीने जावे लागते. बेटाच्या प्रवेशद्वारावरच कालिका देवीचे पुरातन मंदिर आहे. यामुळेच देवी किल्ल्याची रक्षणकर्ती आहे अशी अर्नाळावासियांची धारणा आहे. हे मंदिर पुरातन असून गाभाऱ्यात कालिका देवी, गणपती यासह इतर देवता आहेत. सध्या ज्या ठिकाणी मंदिर आहे ती पुर्वी मराठ्यांनी तयार केलेली सागरी जेट्टी होती असे काही इतिहास अभ्याकांचे मत आहे.
जंजिरे अर्नाळा गाव हे सीता मातेचे माहेरघर मानले जाते. जोपर्यंत सीतामातेचा या गावावर वरदहस्त आहे तोपर्यंत कुठलीही नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्ती या गावाला ठेच पोहचू शकत नाही असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. यामुळेच असंख्य वादळे, सुनामी लाटा यांचा गावाला कधी त्रास झाला नसल्याचे येथील रहिवासी निनाद पाटील यांनी सांगितले.
अर्नाळा किल्य्यातील कोळी बांधवांची कालिका देवीवर श्रद्धा असून खोल समुद्रात मासेमारीला निघण्यापूर्वी कोळी बांधव देवीचे दर्शन घेऊन मगच मासेमारीला निघतात. देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. अर्नाळा परिसर हा फुलशेतीसाठी प्रसिद्ध असून यावेळी गावातील नागरिकांकडून विविध रंगांची सुवासिक फुले विशेषतः फुलांपासून तयार करण्यात येणाऱ्या आकर्षक वेण्या देवीला अर्पण केल्या जातात. यावेळी आजूबाजूच्या गावकऱ्यांसह इतर भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्त या मंदिराला भेट देतात. मंदिरात नऊ दिवस पूजा पाठ, आरती यासह इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याच भागात ऐतिहासिक जंजिरे अर्नाळा किल्ला सुद्धा असल्याने आपसूकच अनेक भाविक भक्त व पर्यटक यांचा ओढा इथे अधिक असतो.
दसऱ्याला मंदिरात मोठा उत्सव
कालिका देवीच्या मंदिरात दसऱ्याला मोठा उत्सव साजरा करण्याची परंपरा असून यानिमित्त पालघर जिल्ह्यातील विविध गावातील कोळी बांधव मोठ्या संख्येने भाविक मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या दिवशी किल्ल्यात उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळते. इतर वेळेस आपल्या मासेमारी व्यवसायात व्यस्त असणारे कोळी बांधव यादिवशी उत्साहाने देवीचा उत्सव साजरा करताना दिसतात. पूर्वी सफाळ्यातील दातिवरे, कोरे, एडवण गावातील भाविक यावेळी बोटी तारवे घेऊन देवीच्या दर्शनासाठी येत असत अशी आठवण येथील गावकऱ्यांनी सांगितली.