कराड दक्षिणेतील काँग्रेसचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना, चौथ्यांदा काँग्रेसच्याच हाती सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींची अनपेक्षित गर्दी राहिल्याने, तसेच चव्हाण यांनी मतदानकेंद्रापासून शंभर मीटर बाहेर बोलणे पसंत केल्याने एकच तारांबळ उडताना, सुरक्षा जवानांसह सर्वाचीच हेळसांड झाली.
चव्हाण म्हणाले, की केंद्रात भाजपची सत्ता असताना, राज्यात प्रमुख पक्ष स्वतंत्र लढत आहेत. अशा विशिष्ट परिस्थितीत जनता पुढील पाच वर्षांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहे. सजगपणे सत्ता कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय त्यांच्यासमोर असून, ते पूर्ण बहुमतासाठी काँग्रेसवरच विश्वास ठेवतील, काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल.
सत्तेसाठी आघाडी करण्याची वेळ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेनेला निवडणार यावर सावध भूमिका घेत योग्यवेळी योग्यच निर्णय घेऊ असे ते म्हणाले. कराड दक्षिणेत आपल्याला चांगला प्रतिसाद लाभला असून, आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले हेच असतील असे त्यांनी स्पष्ट केले.