सीमेवर चीन आणि पाकिस्तान कुरापती काढत असताना लोकसभा प्रचाराच्या काळात ५६ इंच छातीचा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तो छातीचा कोट गेला कुठे, असा सवाल करतानाच मोदी सरकार अजूनही निवडणुकीच्या वातावरणातून बाहेर पडलेले नाही, अशी टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी शनिवारी केली.
मोदी सरकार सत्तेवर येऊन १४० दिवस झाले. पण कोणत्याही महत्त्वाच्या विषयांवर या सरकारने नवे धोरण जाहीर केलेले नाही. कोळसा, पोलाद, हवाई वाहतूक या क्षेत्रांत कोणती धोरणे राबविणारे हे स्पष्ट केलेले नाही. नवी धोरणे कुठे गेली, असा सवाल करतानाच काँग्रेसप्रणीत सरकारच्या काळातील कार्यक्रम फक्त नावे बदलून राबविण्यात येत आहेत, अशी टीका चिदम्बरम यांनी प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना केली.  यूपीए सरकारच्या काळात २३ कोटी बँक खाती काढण्यात आली. भाजप सरकारने जन-धन योजनेत पाच कोटी खाती काढली तर केवढी पाठ थोपटून घेण्यात येत आहे.
प्रचाराचा लुंगीडान्स !
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नटनटय़ा, विविध क्षेत्रातील दिग्गज उतरले असतानाच मुंबईत शनिवारी प्रचाराच लुंगीडान्सही बघायला मिळाला. कारण माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम आणि केंद्रीय नगरविकासमंत्री व्यकंय्या नायडू हे तीन नेते लुंगी नेसून प्रचाराला उतरले होते.  जनता दल (सेक्युलर)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान देवेगौडा हे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईत आले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला. व्यंकय्या नायडू यांनी पत्रकार परिषदेत सीमेवरील घुसखोरीवरून तत्कालीन यूपीए सरकावर टीकाटिप्पणी केली. तेलगू भाषकांची लक्षणिय संख्या असलेल्या धारावी मतदारसंघात त्यांची जाहीर सभा झाली.