समस्यांचे माहेरघर म्हणूनच बहुतांश सरकारी शाळांची ओळख असते. याला अपवाद ठरेल अशी जिल्हा परिषदेची आदर्श शाळा अकोला जिल्हय़ातील शिवणी येथे चिमुकल्यांचे भविष्य घडवत आहे. प्रबळ इच्छाशक्ती राहिली तर काहीही शक्य होऊ शकते, हे या शाळेच्या व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदाने करून दाखवले. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी ‘ज्ञानरचनावाद’ कार्यक्रम सुरू करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे..
एकीकडे इंग्रजी माध्यमांसह खासगी शाळांचं वाढतं प्रस्थ, तर दुसरीकडे दुरवस्थेच्या दुष्टचक्रात सापडलेल्या सरकारी शाळा. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे गळकी छतं, मोडकळीस आलेल्या भिंती, समस्यांचे माहेरघर असलेला परिसर व शिक्षकांचे उदासीन धोरण, हे संपूर्ण राज्यातील चित्र. अकोला जिल्हय़ातील शिवणी येथील जिल्हा परिषद शाळेचं चित्र यापेक्षा काही नवीन नव्हतं. मोलमजुरी करून जीवन जगणारे लोक या भागात राहतात. घरात अठराविशे दारिद्रय़ असताना भरमसाट डोनेशन देऊन खासगी शाळांमध्ये मुलांना कसं शिकवायचं? हा गरीब पालकांपुढे पडलेला प्रश्न. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचीच शाळा खासगी शाळांना तोडीस तोड करण्याचा निर्धार या शाळेचे केंद्रप्रमुख साहेबराव पातोंड, मुख्याध्यापक शैलेंद्र गवई व शाळेतील सर्व शिक्षकवंदांनी केला. शाळेमध्ये मूलभूत सुविधांसोबतच शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा मार्ग वाटतं तेवढा सोपा नसताना हे शिवधनुष्य पेलले. परिसरात शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करून मुलांना शाळेत पाठवा, अशी पालकांना विनवणी करण्यापासून मुख्याध्यापक शैलेंद्र गवई यांनी सुरुवात केली. अत्यंत खडतर प्रवासातून शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापक व शिक्षकांनी मेहनत घेतली. शाळेची इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी, मैदान, शौचालय, शाळेच्या परिसरात वृक्षांची सजावट आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या. अपुऱ्या निधीमुळे कामात कुठेही अडथळा येऊ नये, म्हणून मुख्याध्यापक व शिक्षकांनी एकत्र येऊन शाळेचं रूपडं पालटलं. शाळेचे बाहय़ रूप आकर्षित झाल्याने पालक व विद्यार्थी या शाळेकडे वळू लागले. शाळेची पटसंख्या वाढून आठवीपर्यंतचे एक-एक वर्ग नव्याने निर्माण होत गेले. पहिली व दुसरीचे सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाले. कालांतराने या कार्याला व्यापक स्वरूप प्राप्त झालं. शाळेतील विद्यार्थी यशाचे नवनवीन टप्पे गाठत आहेत.
ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे
या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांकडून विविध प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शाळेमध्ये ज्ञानरचनावाद हा उपक्रम राबविण्यात येतो. या माध्यमातून अप्रगत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी त्यांना विविध शैक्षणिक साहित्यांच्या साहाय्याने भाषा आणि गणित विषयांचे धडे दिले जातात. त्यासाठी विविध साहित्य शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. त्याचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना खेळ व स्पर्धामधून शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांना सुलभ शिकता यावे, म्हणून ज्ञानरचना वर्ग साकारण्यात आले. दोन डिजिटल वर्ग तयार करण्यात आले. जानेवारी २०१५ पासून हा उपक्रम राबविण्यात येत असून याचे सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असल्याचे चित्र आहे. शैक्षणिक साहित्याची कार्यशाळाही घेण्यात आली. गणित व भाषा विषयांत विद्यार्थ्यांचा पाया पक्का होण्यासाठी ज्ञानरचनावाद उपक्रम आदर्श ठरत आहे.
सुजाण नागरिक घडविण्यावर भर
शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक घडण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुणे येथील मुथा फाऊंडेशन व एनसीआरटीच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील ३६ जिल्हय़ांत हा उपक्रम राबविण्यात येत असून, अकोला जिल्हय़ातून या शाळेच्या एकमेव केंद्राची निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत शाळेत आठवडय़ातून तीन तासिका घेतल्या जातात. लोकशाही तत्त्वावर आधारित हा उपक्रम असून, यामध्ये विद्यार्थ्यांना विविध सामाजिक ज्ञान दिले जाते. शाळेने उत्तम रीतीने हा कार्यक्रम राबविल्याने एनसीआरटीचे एक पथक शाळेला लवकरच भेट देऊन माहिती जाणून घेणार आहे.
बालकेंद्रित शिक्षण पद्धती
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून शिकवताना बालकेंद्रित शिक्षण पद्धतीचा वापर केला जात आहे. शाळेमध्ये निसर्ग वाचनालय हा अनोखा उपक्रम राबविण्यात येतो. यामध्ये शाळेच्या निसर्गरम्य परिसरामध्ये वृक्षांना विविध प्रकारे पुस्तके बांधली जातात. त्यामध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल, अशाच पुस्तकांचा समावेश असतो. दर शनिवारी विद्यार्थ्यांना वाचनासाठी त्या ठिकाणी सोडले जाते. विद्यार्थी निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच वृक्षाला बांधलेल्या पुस्तकांचे आवडीने वाचन करतात.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा शाळेत घेण्यात येतात. स्काऊट गाइडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी शाळेत चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. शाळेमध्ये दरवर्षी उन्हाळी वर्ग घेतले जातात. अकोला जिल्हय़ातील रखरखत्या ४६ अं.से. तापमानामध्येही निरंतर उन्हाळी वर्ग घेण्यात आले. उन्हाळी वर्गात विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, सामान्य ज्ञान, भौगोलिक ज्ञान आदींचे धडे दिले गेले. विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिल्यास त्या वर्गातील विद्याथ्र्र्यासह शिक्षक संबंधित विद्यार्थ्यांचे घर गाठून समस्या जाणून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत हजर राहण्याचे प्रमाण जवळपास १०० टक्के आहे.
पर्यावरणपूरक वाढदिवस
शाळेमध्ये पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा करण्याची २००७ पासूनची परंपरा आहे. शाळेतील शिक्षक किंवा विद्यार्थ्यांचा वाढदिवस रोपटे देऊन साजरा केला जातो. त्या रोपटय़ाचे मोठय़ा वृक्षात परिवर्तन होईपर्यंत संगोपन केले जाते. शाळेतील शिक्षिका वंदना बोर्डे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रबोध देशपांडे
संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com