अभिजात साहित्य लोकप्रिय होत नाही, असे म्हटले जाते. भैरप्पा यांच्या साहित्याने हा समज पुसून टाकला. पुस्तक विक्रीचे उच्चांक मोडणाऱ्या भैरप्पा यांच्या कादंबऱ्या पुस्तकांच्या दुकानात येण्यापूर्वीच त्याबद्दल वाचकांच्या मनात वाचनाची ऊर्मी जागी होते, असा अतिशय वेगळा आणि तरीही सतत सभोवतालावर संवेदनशीलपणे नजर ठेवणारा साहित्यिक म्हणून ते वाचकांच्या पसंतीस उतरले.

संतेशिवरा लिंगण्णैया भैरप्पा यांनी लेखनासाठी कादंबरी हाच आकृतिबंध स्वीकारला आणि या लेखन प्रकारात आपले वेगळेपण अनेक अंगाने सिद्ध केले. कर्नाटकात राहून मराठीत कथा लिहिणारे जी. ए. कुलकर्णी यांच्यामुळे मराठी भाषकांना कन्नड संस्कृतीचा परिचय झालाच होता. भैरप्पा यांच्यामुळे तो अधिक दृढ़ झाला. श्रीमती उमा कुलकर्णी यांनी त्यांच्या कादंबऱ्यांचे केलेले अनुवाद मराठी वाचकांसाठी मोठी पर्वणी ठरली. मराठी वाचकांच्या मनात भैरप्पा यांनी आपले स्थान पक्के केले, ते त्यांच्या कसदार लेखनामुळे. गेली सहा दशके वाङ्मयाच्या विविध प्रांतात मुशाफिरी करूनही त्यांची ओळख भारतातील ज्येष्ठ कादंबरीकार अशीच राहिली.

अतिशय तरल आणि गुंतागुंतीच्या मानवी संबंधाचे तेवढेच कलात्मक चित्रण करणाऱ्या भैरप्पांचा जन्म २० जुलै १९३४ रोज़ी कर्नाटकातील हसन येथे झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या भावाचा मृतदेह खांद्यावर घेऊन झुडपांच्या साह्याने अग्निसंस्कार करावे लागलेल्या भैरप्पांचे जीवन या एका प्रसंगाने अक्षरश: ढवळून निघाले. लेखनातून आपल्या स्वतःच्या आणि परिसरातील अनेकांच्या जगण्यातील दु:खाच्या विराण्या भैरप्पा आपल्या लेखनातून मांडत गेले. त्यांच्या शैलीदार लेखणीमुळे या साऱ्या कथांचा विशाल पट वाचकांना लपेटून टाकणारा ठरला. हे लेखन त्यांच्या अंतर्मनाला साद घालणारे ठरले आणि त्यामुळेच एक अभिजात साहित्यिक म्हणून त्यांना लौकिक मिळाला.

वयाच्या तेराव्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या भैरप्पांना शिक्षण सोडावे लागले. भारतभर हिंडून शेवटी मुंबईत रेल्वे खात्यात पोर्टर म्हणून अल्पकाळ काम करावे लागले. पण शिक्षणाची कास सोडायची नाही, असे ठरवून ते परत म्हैसूरला आले. पदवी मिळवल्यानंतर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात त्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली. हुबळी महाविद्यालय, गुजरातचे सरदार पटेल विद्यापीठ, दिल्लीतील एन.सी.ई.आर.टी.(नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) अशा संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचे काम केले. म्हैसूरमधील रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून १९९१मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी १९५८ मध्ये लेखनाला सुरुवात केली आणि वंशवृक्ष या त्यांच्या कादंबरीने कन्नड साहित्यात वादळच निर्माण झाले. कथानकाचा प्रचंड आवाका सांभाळत त्यातील बारकावे समजावत प्रत्येकाला कवेत घेण्याची क्षमता असलेल्या या कादंबरीने त्यांना पदार्पणातच प्रसिद्धीच्या झोतात आणले. गेल्या साडेसहा दशकांत पंचवीसहून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि त्यातील बहुतेक कादंबऱ्यांनी विक्रीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. महाभारतावर आधारित पर्व, संगीताच्या पार्श्वभूमीवरील `मंद्र` यासारख्या कादंबऱ्यांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

इंग्रजीसह बहुतेक भारतीय भाषांमध्ये भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद प्रसिद्ध झाले. वातावरण आणि संस्कृतीमधील धागेदोरे वेगळे असूनही भारतीय वाचकांनी त्यांच्या लेखनाचे मनापासून स्वागत केले. भारतीय कादंबरीकार असे बिरूद मिरवणाऱ्या थोड्या साहित्यिकांमध्ये भैरप्पा यांचे स्थान त्यामुळेच पक्के झाले. अभिजात साहित्य गुण, सौंदर्याचा कलात्मक आविष्कार, तत्त्वज्ञानाचा स्पर्श आणि संगीत अशा अनेक गुणांनी मंडित झालेले भैरप्पा यांच्या साहित्याने भारतीय साहित्यक्षेत्रात महत्त्वाची भर घातली. साहस, धैर्य आणि संघर्ष यांनी भरून राहिलेले त्यांची जीवन वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या साहित्यातून उमटत राहिले.

ललित लेखनाबरोबरच टीकात्मक लेखन करणारे लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. भारतीय अभिजात संगीताचे ते जाणकार होते. त्यांचे हे संगीतप्रेमही त्यांच्या साहित्यातून व्यक्त होत राहिले. १९५५ मध्ये प्रकाशित झालेली त्यांची पहिली कादंबरी ‘गाथा जन्म मत्तेदरू कठेगळू’ आणि २०१७ मध्ये प्रकाशित झालेली ‘उत्तराखंड’ ही शेवटची कादंबरी.

साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, पद्मश्री, पद्मभूषण यासारखे अनेक सन्मान त्यांच्या साहित्याच्या वाट्याला येणे ही अगदीच स्वाभाविक घटना होती. आपल्या लेखनाने अवघ्या भारतीय वाचकांचे आकर्षण ठरलेल्या एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने देशपातळीवरील एका महत्त्वाच्या लेखकाला आपण मुकलो आहोत.

साहित्यकृती

अंचू (कादंबरी, मराठीत ‘काठ’)

अवेषण (कादंबरी, मराठीत ‘परिशोध’)

आवरण

उत्तराकांड

कथे मत्तु कथावस्तू

कवालू

गृहभंग

ग्रहण

छोर

तंतु

तब्बलियु नीनादे मगने (मराठीत ‘पारखा’)

दाटु (कादंबरी, मराठीत ‘जा ओलांडुनी’)

दूर सरिदारु

धर्मश्री

नानीके बरेयुत्तीने

नायी नेरालु

निराकरण

नेले

पर्व

भित्ती

भीमकाया

मतदान

मंद्र

याना

वंशवृक्ष

वामशवृक्ष

साक्षी

सार्थ

पुरस्कार

एन.टी.आर, नॅशनल लिटररी अवॉर्ड(२००७)

कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार (१९६६)

श्री कृष्णदेवराय अवॉर्ड (२०१७)

नडोजा अवॉर्ड (२०११)

नृपतुंगा अवॉर्ड (२०१७)

गुलबर्गा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट (२००७)

पद्मश्री पुरस्कार (२०१६)

पंपा पुरस्कार (२००५)

बेटागिरी कृष्ण शर्मा अवॉर्ड (२०१४)

वाग्विलासिनी पुरस्कार (२०१२)

सरस्वती सन्मान (इ.स. २०११)- ‘मंद्र’ या कादंबरीसाठी के.के. बिर्ला फाउंडेशनकडून.

साहित्य अकादमी पुरस्कार (१९७५) (‘दाटु’ या कन्नड कादंबरीसाठी)

पद्मविभूषण

सन्मान

कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९९९)

भारत सरकारतर्फे राष्ट्रीय संशोधन प्रोफेसर म्हणून मान्यता

(२०१४) भारत सरकारकडून साहित्य अकादमीची शिष्यवृत्ती (२०१५)