आरती कदम

वंचित मुलांसाठी ‘ज्ञानदेवी’ ही संस्था काढून हजारो मुलांच्या आधारवड झालेल्या डॉ. अनुराधा. गेली ३० वर्षे बाल गुन्हेगार, बालमजुरी, बालवेश्या, बालविवाह, शाळा गळती, बाल व्यसनाधीनता यांच्या विरोधात ठामपणे उभ्या राहात त्यात अडकलेल्या मुलांना प्रतिष्ठेचे आयुष्य देत आहेत.  ‘हेल्पलाइन १०९८’, ‘गंमतशाळा’, ‘बालसेना’, ‘पिअर सपोर्ट ग्रुप’, ‘अभिमन्यू प्रकल्प’च्या माध्यमातून हजारो मुलाचं हरवलेलं ‘बालपण’ त्यांना परत देणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, पुणे येथील डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे.

‘मुलं म्हणजे देवाघरची फुलं’ या कविकल्पनेला छेद देणारेच अनुभव रोजच्या रोज घेणाऱ्या डॉ.अनुराधा सहस्रबुद्धे. गेली ३० वर्षे टोकाच्या शारीरिक आणि मानसिक यातना सहन करणाऱ्या हजारो मुलांच्या डोक्यावर हात ठेवून ‘आम्ही आहोत तुझ्याबरोबरच’चा आशावाद पेरत त्यांना जगणं शिकवीत आहेत. आणि हे जगणं शिकलेली असंख्य मुले आज त्यांच्या

पुढच्या पिढीला या दलदलीतून बाहेर काढत आहेत. बालगुन्हेगारी, बालमजुरी, बालवेश्या, बालविवाह यांचं प्रमाण कमी होण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या, मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या डॉ. अनुराधा यांचं आयुष्य म्हणूनच अनेकांसाठी आनंदाचं झाड झालं आहे.

मुलं दोन प्रकारची असतात. सुरक्षित  कुटुंबातली आणि दुसरी अनाथ, बालपण हरवलेली मुलं. कुणाला जन्मत:च आई-बाबा नाहीत तर कुणाला आई-बाबांनीच वाऱ्यावर सोडलेलं, काही पळून आलेली, काही पळवून आणलेली, कोणी चोर झालेली, कोणी भिकारी बनवलेली, कुणी तुरुंगाची हवा खाल्लेली तर अनेक लैंगिक अत्याचार झालेली, रोगग्रस्त. आणि याच्याही पलीकडची, घरात राहूनही घरपण हरवलेली, प्रेमाला भुकेली असंख्य मुलं. या मुलांची आई, मम्मी, माँ बनलेल्या अनुराधा यांनी आपल्या ‘ज्ञानदेवी’ या संस्थेचं छप्पर या मुलांच्या डोक्यावर धरलं आहे.

१९९२ मध्ये झोपडपट्टीतील मुलांसाठी काम करायचं नक्की झालं आणि डॉ. अनुराधा यांनी ‘ज्ञानदेवी’ ही संस्था सुरू केली. या मुलांच्या विकासातला त्यांचा सर्वात यशस्वी उपक्रम ठरला तो गंमतशाळेचा. याचा उद्देशच झोपडपट्टीतील मुलांमधील न्यूनगंड दूर करणे हा होता. या न्यूनगंडातूनच त्यांच्यातील व्यसनाधीनता, गुन्हेगारी वाढत होती. आणि त्यातूनच पुढे बालमजुरी, बालविवाहासारखे अपरिहार्य टप्पे त्यांच्या आयुष्यात येत होते. पण या गंमतशाळेने त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या पालकांच्या आयुष्यात आत्मविश्वास निर्माण केला आणि मुलं जगणं शिकली.  गंमतशाळेत शिकलेली आणि आता मोठी झालेली असंख्य मुलं. कुणी पदवीधर झालं, कुणी उद्योजक. कालच एका मुलाने आपल्या ‘टू व्हीलर’च्या दुसऱ्या शोरूमच्या उद्घाटनासाठी अनुराधा यांना निमंत्रण दिलं. दारुडा म्हणून वाळीत टाकलेली, वाया गेलेली म्हणून हिणवली गेलेली अनेक मुलं आज स्वत:च्या पायावर उभी आहेत. जुन्या वस्त्यांमध्ये शंभर टक्के दारूबंदी करण्यात याच मुलांचा पुढाकार आहे. अनेक अत्याचारित मुली आज लग्न करून संसारात सुखी आहेत. या सगळ्यांचं आयुष्यं अनुराधांना कृतकृत्य करतं.

या गंमतशाळेच्या कामात त्यांना महत्त्वाचा हात मिळाला तो हेल्पलाइन १०९८ चा. १८ वर्षांपूर्वी योगायोगाने मुलांसाठीची ही हेल्पलाइन त्यांच्याकडे आली आणि अनेकांची आयुष्य वाचली, सावरली, सार्थकी लागली. सुरुवातीला या हेल्पलाइनवर हजारच्या आकडय़ात येणारं कॉल्सचं प्रमाण वाढत जाऊन त्याचं कॉल सेंटर होईपर्यंत म्हणजे २०१० पर्यंत दर महिना २० ते २५ हजार कॉल्स इतकं वाढलं. आणि तेही फक्त पुणे परिसरातील मुलांचं. हरवलेली, पळून आलेली इथपासून आई-वडिलांनीच अत्याचार केलेली मुलं फोनवर आपल्या कर्मकहाण्या सांगतात. तर काही ‘काचेच्या’ संपन्न घरातली मुलं, ‘मला आज शाळेत बक्षीस मिळालं’, ‘आज बाई ओरडल्या’, हे सांगायलाही फोन करतात. कारण त्यांचं ऐकून घेणारं घरी कुणीच नाही. त्या सर्व मुलांना ‘ऐकणारा कान’ मिळाला तो या हेल्पलाइनच्या माध्यमातून. या हेल्पलाइनचा एक महत्त्वाचा उपयोग झाला तो पळून वा पळवून आणलेल्या मुलांना पुन्हा घरी पाठवण्यासाठी. अशी असंख्य मुलं आपापल्या घरी परत पाठवली गेली. या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुराधा आणि त्यांच्या १६ सहकाऱ्यांना हत्तीचं बळ देऊन जातो.

या बळातून राबवला गेला तो आणखी एक मोलाचा उपक्रम म्हणजे ‘मित्रसहाय्यता’ वा ‘पीअर सपोर्ट ग्रुप’ आणि ‘बालसेना.’ पुण्यातील सुमारे १५० शाळांमध्ये हा उपक्रम सुरू असून यातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचं महत्वाचं काम यातून होत आहे. आज या शाळांमधील  मुलं इतकी तयार झाली आहेत की झोपडपट्टीतील मुलांना शिकवायला जाण्यापासून बालविवाह, बालमजुरी रोखणं याबरोबरीने त्यांच्या स्वत:च्या शाळांतील स्वच्छतागृहं, मैदानं बांधण्यासाठी आग्रही राहात आहेत. इतकंच नव्हे तर आपल्या मित्रांवर होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी पुढे येत आहेत हे विशेष. या मुलांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करण्याबरोबरच संवेदनशील नागरिक बनण्याचं महत्त्वाचं काम होत असल्यानेच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम सर्व शाळांत राबविण्याचं आदेशपत्र जारी केलं.

या मुलांसाठी काम करणं इतकंच अनुराधा यांचं काम मर्यादित नाही. युवक-युवतींचे प्रश्न त्यांच्या पातळीवर जाऊन सोडवणं, स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करून त्यांना प्रतिष्ठेचं आयुष्य जगायला शिकवणं यासाठीही त्या वस्त्या वस्त्यांतून प्रशिक्षण देतात. त्यापलीकडेही त्यांचं वैयक्तिक पातळीवरील काम इतकं आहे की लिहायला जागा अपुरी पडावी. थोडक्यात सांगायचं तर अनुराधा यांनी आहारशास्त्रात उच्चशिक्षण घेतलं आहे. त्यांची पीएच.डी.आहे स्त्रियांचं प्रौढ शिक्षण या विषयात. शिवाय जर्मन, जपानी, बंगाली, संस्कृत आणि होमियोपथीत  त्यांनी पदविका मिळवली आहे. त्यांनी अनेक नाटकं, कविता लिहिल्या असून त्यांचे २०० संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. फोर्ड फाऊंडेशकडून त्यांना अमेरिकेच्या दौऱ्यांसाठी फेलोशिपही मिळाली आहे. त्यांची वीस पुस्तकंही प्रसिद्ध आहेत.

प्रौढ शिक्षणापासून सुरू झालेला डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांचा हा प्रवास वेगवेगळी वळणं घेत इथपर्यंत पोहोचला आहे. गेल्या ३० वर्षांत खूप काही घडलं आहे, घडवलं गेलं आहे. आज वयाच्या ६५च्या टप्प्यावर उभं राहून खूप काही घडायची इच्छा त्या बाळगून आहेत. डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांच्या खणखणीत स्त्रीनेतृत्वाला आमचा सलाम!

ज्ञानदेवी- ६० पाटील इस्टेट, २ मुंबई रस्ता पुणे ४११००५  दूरध्वनी-०२०२५५४०१५६

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा

सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स पॉवर्ड बाय- व्ही. एम. मुसळुणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिाइझर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा

dnyanadeviorg@gmail.com

arati.kadam@expressindia.com