डॉ. कुमार सप्तर्षी

वरकरणी अस्ताव्यस्त वाटत असला तरी प्रचंड शिस्तीचा भोक्ता, साधेपणा, चैतन्यशील वृत्ती आणि १८ भाषांवर असलेले प्रभुत्व ही जॉर्ज फर्नाडिस या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े. संघटन कौशल्यात महात्मा गांधी यांच्यानंतरचा दुसरा नेता कोण या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जॉर्ज असेच मी म्हणेन. माझा ज्येष्ठ सहकारी आणि चळवळीतील साथी जॉर्ज याला भावपूर्ण श्रद्धांजली. आमच्या दृष्टीने जॉर्ज याच्यामधील चैतन्य संपल्यामुळे दहा वर्षांपूर्वीच तो संपला होता. स्मृतिभ्रंश झाल्यामुळे त्याचे एका बालकात रूपांतर झाले होते. हे पाहणे आमच्यासाठी वेदनादायी होते. त्याच्या निधनाची बातमी केव्हाही येऊ शकेल याची कल्पना होती. तो दिवस अखेर आज आला.

जॉर्ज याच्याशी माझा परिचय झाला तो १९६६ मध्ये. कामगार संघटनेमधून संसदीय राजकारणात प्रवेश करणारा नेता म्हणून माझ्या मनात जॉर्जविषयी कुतूहल होते. त्या काळी काँग्रेसमध्ये बडं प्रस्थ असलेले स. का. पाटील यांना पराभूत करणे हे अवघड ध्येय जॉर्जने साध्य केले होते. समाजवादी नेते स्थितिशील राहिले, पण समाजवादी असूनही जॉर्ज गतिशील होता. त्यामुळे सारी क्षेत्रे पादाक्रांत करण्याची त्याची मनीषा होती आणि ती त्याने साध्यदेखील केली. वेगळय़ा क्षेत्रात प्रवेश करताना संघटनेचे काम सहकाऱ्यांकडे सोपवून तो पुढे जात राहिला. बाळ दंडवते आणि तुलसी बोरा यांनी संघटनांचे काम पुढे नेले.

युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांदचे काम जॉर्जला मनापासून आवडले. संघर्षांची वृत्ती हे आम्हा दोघांमधील साम्य. घामाच्या धारा लागलेल्या असताना लुंगी सावरून तो भाषण करायचा. वेळेची आणि भुकेची शुद्ध नसायची. बऱ्याचदा गाडीत केळी आणि केकचे तुकडे असायचे. त्यावरच आम्ही भूक भागवायचो. कामगारांचा संप फुटण्याच्या बेतात आला असताना जॉर्जचे भाषण त्यांना पुन्हा एकदिलाने काम करण्यासाठी चैतन्य द्यायचे आणि कामगार संप सुरू ठेवण्याचा निर्धार करायचे. संघटनेत नव्या मुलांशी संवाद राखण्यास तो सदैव उत्सुक असायचा. समोर कोणीही असो, तिला आधी बोलू देऊन मग तो बोलत असे. हीच त्याची कार्यपद्धती माणसांना त्याच्याकडे आकर्षित करून घेत असे. एकीकडे मृणाल गोरे, आबा करमरकर आणि बाबुराव सामंत यांच्यामध्ये तो रमायचा, तर मधू लिमये यांच्याशी त्याचा वैचारिक स्नेह होता. प्रजा समाजवादी पक्षाच्या हातामध्ये असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये त्याने समाजवादी संघटनेची भक्कम पायाभरणी केली. रेल्वे संपाची त्याने केलेली तयारी पाहून मी थक्क झालो होतो. रेल्वे संपामुळे आणीबाणी लादली असे वक्तव्य त्या वेळी इंदिरा गांधी यांनी केले होते. हे सर्वस्वी खरे नसले तरी रेल्वेचा संप हे आणीबाणी लादण्याचे एक कारण होते असे ठामपणे म्हणता येते. जॉर्ज बिहारमधून निवडून आला त्या वेळी त्याला तेथील राजकीय नेत्यांनी उपरा ठरवले होते. राजकारणातून निवृत्त हो असे सांगण्यासाठी एकाने तर जॉर्जवर हल्लादेखील केला होता. पण, त्या साऱ्याला जॉर्ज पुरून उरला.

जॉर्जचे अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी चांगले जमायचे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची जॉर्ज ही ‘आयडेंटिटी’ होती. गुजरात दंग्याच्या वेळी मोदी सरकार बरखास्त करावे यावर अटलजी आणि जॉर्ज यांचे एकमत होते. मात्र, भाजपच्या अन्य नेत्यांनी खोडा घातला आणि हा निर्णय घेता आला नाही. ‘राजधर्माचे पालन करा’, असे अटलजी वारंवार बोलत राहिले. माझ्या निवडणुकीच्या वेळी १९७८ मध्ये जॉर्ज याने दहा हजार रुपये पाठविले होते. त्या वेळी पैशांना किंमत होती. एवढेच नव्हे तर ख्रिश्चन मतांसाठी त्याने माझ्या प्रचारार्थ सभा घेतली आणि माझा विजय होईल याची दक्षता घेतली. ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी जॉर्ज याच्याशिवाय दुसरा पाहुणा असूच शकत नव्हता. त्याच्याच हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. जॉर्जसारखा गतिशील माणूस निष्क्रिय राहूच शकत नव्हता. त्याला नियतीनेच शांत राहण्यास सांगितले. स्मृतिभ्रंशामुळे तर गेल्या दहा वर्षांपासून तो असून नसल्यासारखाच होता. आता तर शरीरानेही तो आपल्यातून गेला आहे, मात्र त्याची स्मृती सदैव तेवत राहील.