राज्यात सरकार बदलले आणि रखडलेल्या बदल्यांचा जोर सर्वत्र आहे. आता बदलीची जागा आणि गैरसोय दूर व्हावी म्हणून औरंगाबादमधील एका आमदारास ‘विमान’त भेटावे लागते म्हणे. शिंदे गटातील मंत्री नसलेल्या आमदारांचे व्यक्तिगत दालन विमानाच्या आकाराचे आहे. म्हणजे दालनात बसलो आहोत की विमानात हे कळत नाही, अशी त्याची रचना. विमानात असते तशीच आसन व्यवस्था. एक खिडकी अगदी तशीच रंगवलेली. त्यामुळे या विमानात गेले की बदली होते. त्यामुळे औरंगाबादमधील बदलीच्या विमानात बसण्यासाठी अगदी परजिल्ह्यातील मंडळींचाही राबता वाढला आहे म्हणे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाद दोन राजांचा आणि खोड दादांची.. 

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंमध्ये पालिकेच्या राजकारणावरून दररोज वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप होत असतात. अशाच आरोप-प्रत्यारोपात  चर्चा झाली ती मात्र प्रसिद्ध दादांची. या आठवडय़ात तर  शिवेंद्रसिंहराजेंनी  उदयनराजेंना पालिकेच्या राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा प्रेमळ सल्ला दिला. त्यावर ज्यांना नागरिकांनीच पालिकेतून निवृत्त केले आहे त्यांनी सल्ले देऊ नयेत, असे उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिले. मी भाजपत जाणार याची कुणकुण लागताच, हे भाजपत गेले. त्यामुळेच आम्ही जाण्याचा निर्णय लांबवला. ते भाजपत गेले म्हणून आम्ही गेलो असा ते अर्थ काढत असतील तर ते चुकीचे आहे. त्यांच्यानंतर अनेकांनी भाजप प्रवेश केला. तसेच त्यांच्या प्रसिद्ध ‘दादां’नी देखील भाजपबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, असे सांगत उदयनराजे यांनी अजित पवार यांचीही खोड मोडण्याची संधी सोडली नाही. 

राज्यमंत्री की दुभाषक? 

दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या बीड-परळी-नगर या भाजपसाठी महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचा आष्टी ते नगर हा टप्पा पूर्ण झाला. या रेल्वे गाडीला एकदा आष्टीतून नगरकडे आणि नंतर पुन्हा काही दिवसांनी नगरमधून आष्टीकडे सोडण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दोनदा हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानिमित्ताने नगरमधील रेल्वेच्या प्रश्नांसाठी केंद्रीय राज्यमंत्री दानवे, खा. डॉ. सुजय विखे, खा. प्रीतम मुंडे आणि रेल्वेच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. दानवे प्रश्न मन लावून ऐकत होते आणि पेन्सिलने डायरीत टिपूनही घेत होते. मात्र त्यांच्या शेजारीच बसलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. ते लक्षात आल्याने दानवे यांनी त्यांना हिंदीतून मराठी समजते का?ह्ण असे विचारले. अधिकाऱ्यांनी नाही म्हणून सांगितले. त्यावर खासदार विखे यांनी इतका वेळ काय रामायण घडलेह्ण, असे म्हणत कपाळावर हात मारून घेतला. त्यांच्या या कृतीने सभागृहात हास्याचा फवारा उडाला. नंतर मंत्री दानवे यांच्यावरच अधिकाऱ्यांना हिंदीतून प्रश्न समजावून सांगण्याची वेळ आली.

पालकमंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक 

सोलापूर जिल्ह्यात भाजप प्रबळ होत असताना या पक्षाचे एकखांबी नेतृत्व दिसत नाही. आपापली ताकद वाढविण्यासाठी माजी मंत्रीद्वय सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांच्यात होणारे शह-काटशहाचे राजकारण गेली सात-वर्षे सोलापूरकरांनी जवळून पाहिले आहे. आता त्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भर पडली आहे. विखे-पाटील पालकमंत्री म्हणून सोलापुरात आलेले आमदार विजय देशमुख यांना रुचलेले दिसत नाही. आमदार सुभाष देशमुख यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मागील दौरा जवळजवळ काबीज केला होता. त्यामुळेच की काय, विखे-पाटील यांच्या मागील दौऱ्यातील कार्यक्रमापासून विजय देशमुख हे चार हात दूर राहिले होते. त्यानंतर नुकतेच विखे-पाटील पुन्हा सोलापुरात येऊन गेले. तेव्हा विखे-पाटील यांच्याशी जवळीक साधत सुभाष देशमुख गटाने विजय देशमुखविरोधी मंडळींना जोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मंगळवेढय़ात सोलापूर महापालिकेतील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांची पालकमंत्री विखे-पाटील यांच्याबरोबर घडवून आणलेल्या भेटीचा हाच अन्वयार्थ लावला जातो. जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मूळ सुभाष देशमुख गटाचेच. अलीकडेच ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष बनल्याचा योग साधून आता पुन्हा विजय देशमुख यांची शिकार करण्यासाठी पालकमंत्री विखे-पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.

नाना आणि काकांमध्ये दुरावा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे (नाना) व आता राष्ट्रवादीत असलेले जयसिंगराव गायकवाड (काका) हे दोघेही पहिल्या रांगेत आणि एकाच खुर्चीच्या अंतराने बसलेले दिसले. दोघांमध्ये एकाच खुर्चीचे अंतर होते. दीड तासापेक्षा अधिक काळ जवळ-जवळ बसूनही दोघांमध्ये संवाद घडला नाही (की जाणीवपूर्वक संवाद साधला नाही). दोघेही जनसंघाच्या मुशीतून तयार झालेले, एकत्र प्रचार केलेले, भाजपचे नेते, मंत्री झालेल्या या दोन नेत्यांचे पुढे राजकीय मार्ग बदलले. तरीही पूर्वपक्षीय मैत्री म्हणून संवाद होतानाचे चित्र काही दिसले नाही. दोघांमधील अबोला आणि दुरावा अनेकांच्या नजरेने टिपला नाही तर नवलच! नाना भाजपतच राहून ज्येष्ठ नेते म्हणून निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत, तर काका आता राष्ट्रवादीत आहेत. काकांनी गतवर्षी दुसऱ्यांदा राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. जनसंघ, भाजप, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, पुन्हा भाजप व आता परत एकदा राष्ट्रवादी अशी काकांची पक्षीय परिक्रमा झालेली.

सहभाग : सुहास सरदेशमुख, विश्वास पवार, मोहनीराज लहाडे, बिपीन देशपांडे,एजाज हुसेन मुजावर

More Stories onचावडीChavadi
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government changed state personal plane aurangabad inconvenient mla ysh
First published on: 22-11-2022 at 00:02 IST