लोकांच्या दृष्टीने रुक्ष आणि किचकट असलेल्या विज्ञानासारखा विषय सोपा करून सर्वसामान्यांना समजावून सांगणारा आणि तो लोकप्रिय करणारा महत्त्वाचा विज्ञान कार्यकर्ता असे डॉ. जयंत नारळीकर यांचे थोडक्यात वर्णन करता येईल. त्यांच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगायचे तर, त्यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. ज्ञानाचा वारसा त्यांना आई-वडिलांकडून लाभला. वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर प्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसीमध्येच झाले. उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिजला जाऊन १९६३मध्ये त्यांनी पीएचडी पदवी घेतली. या काळात त्यांना स्मिथ पुरस्कार, अॅडम पुरस्कार मिळाला. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन पदक आणि इतर सन्मान मिळाले.
डॉ. नारळीकर यांना १९६६मध्ये मंगला सदाशिव राजवाडे यांच्या रूपाने जीवनसाथी मिळाला. त्याही गणितज्ज्ञ होत्या. त्यांच्या गीता, गिरिजा व लीलावती या तिन्ही मुली विज्ञानामध्ये संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. जयंत नारळीकर यांना संशोधन, लेखन याबरोबरच छायाचित्रणाचाही छंद होता. त्यांनी टिपलेल्या आणि मुद्रित केलेल्या ४१ नोंदी ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह’ला दिल्या. त्यात केम्ब्रि, अमेरिका येथील दुर्मीळ संग्रह आहे. त्याशिवाय विवाहाच्या चित्रीकरणासारखे मोलाचे वैयक्तिक क्षणही आहेत.
डॉ. नारळीकर १९७२मध्ये भारतात परतल्यानंतर मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) खगोलशास्त्र विभागात (१९७२-१९८९) प्रमुख म्हणून पद स्वीकारले. तेथे ‘थिऑरॉटिकल अॅस्ट्रोफिजिक्स ग्रुप’चा विस्तार झाला.