आपल्या समाजाला, गावाला विकासाच्या वाटेवर नेण्याचं स्वप्न त्यांना ‘फेलोशिप’ मिळवून देणारं ठरलं. त्या प्रशिक्षणातून ४३ गावांतील ७५ तलावांनी केवळ मोकळा श्वास घेतला नाही तर तेथील समाजाची आर्थिक उन्नतीही केली. जैवविविधतेत भर घालणाऱ्या २१४ पाणवनस्पतींची लागवड, ५९ माशांच्या जातींचे संवर्धन तसेच ‘माशांचं लोणचं’ व माशांना बाजारपेठ मिळवून दिल्याने ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यासाठी अविश्रांत मेहनत घेणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ‘जलकन्या’ शालू कोल्हे आहेत आजच्या दुर्गा.

मासेमारी क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत ४३ गावांतील सुमारे ७५च्या वर तलावांचे त्यांनी केलेले पुनरुज्जीवन, ५९ स्थानिक माशांच्या जातींचे केलेले संरक्षण व संवर्धन, तलावातील २१४ वनस्पतींचे पुनरुज्जीवन करून जैवविविधतेत घातलेली भर. नियमित रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे स्थानिक स्त्री-पुरुषांचा वाढलेला आत्मविश्वास या गोष्टींमुळे तेथील गावांचा कायापालट झाला आहे. ज्यांच्या अथक परिश्रमामुळे तलावांनी केवळ मोकळा श्वास घेतला नाही, तर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या तेथील मासेमार समाजाची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावलेे. तलाव जिवंत करणारी ‘जलकन्या’ अशी उपाधी मिळवणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातल्या निमगावच्या शालू जगदीश कोल्हे यांचे तलाव पुनरुज्जीवन कार्यातील योगदान मोलाचे ठरत आहे.

गोंदिया जिल्ह्यात मोरगाव अर्जुनी तालुक्यातील निमगाव हे एक गाव. गावात ९५ मासेमार कुटुंबं. मासेमारी हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. माशांचे उत्पादन घटल्याने समाजाला आर्थिक चणचण जाणवत होती. पण, मार्ग सापडत नव्हता. त्याच वेळी नागपूर जिल्ह्यातील शालू लग्न होऊन निमगावात आल्या. सामाजिक उपेक्षा आणि स्त्रियांप्रती असलेला दुय्यम भाव शालू यांना खटकत होताच, आत्मसन्मानाची आणि सामाजिक उत्थानाची आस काहीतरी करून दाखविण्यास प्रेरित करत होती. त्याच वेळी ‘फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट’ (फीड) संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली.

२०१३-१४ मध्ये शालूंना ‘कोरो इंडिया’ची फेलोशिप मिळाली. तेथे घेतलेलं प्रशिक्षण त्यांना गावच्या विकासाचा मार्ग दाखवून गेलं. शालू यांच्या मार्गदर्शनाखाली कविता मौजे, सरिता मेश्राम यांच्यासह १६ स्त्रियांच्या गटाने तलावातील विविध प्रजातींचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. गावच्या जाणत्या मंडळींची त्यासाठी मदत झाली. एकीकडे अस्ताव्यस्त आणि प्रचंड वाढणाऱ्या ‘बेशरम’ वनस्पतीचे संकट आणि दुसरीकडे बंगाली माशांचा उपद्रव यातून ‘मामा’ (या तलावांना माजी मालगुजारी म्हणतात.) तलावांचा श्वास कोंडला होता. हीच कोंडी फोडण्यासाठी ‘फीड’ संस्थेचे मनीष राजनकर, पतीराम तुमसरे आणि नंदलाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली गावातल्या लोकांना एकत्र करत श्रमदानाने गोंदिया जिल्ह्यातील ४५ ‘मामा’ तलावांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यात आले.

पावसाळ्याआधी तलावाची नांगरणी करून पाऊस पडल्यानंतर तेथे गाद, चिला, पाज, देवधान, पोवन, कमळ, चौरा, राजोली, खस आदी ११ प्रकारच्या पाणवनस्पतींची लागवड केली. त्यासाठी स्त्री व पुरुष दोघांनाही समान मजुरी दिली. या प्रयोगातून मासेमार समाजातील लोकांचे उत्पन्न वाढले आणि तलावही जैवविविधतेने समृद्ध झाले. बंगाली माशांऐवजी मुलकी (स्थानिक) माशांचे उत्पादन घेणं सुरू झालं त्यासाठी स्त्रियांना मासे पकडण्यापासून ते बाजारात विक्री करण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिलं गेलं. सहा महिन्यांत मुलकी माशांची नुसती संख्या वाढली नाही तर त्या माशांचे विक्रमी उत्पादन झाले. पूर्वी जे मासे २०० ते ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वाढत नव्हते, त्यातील एकेक मासा आता एक किलोपेक्षा अधिक वजनाचा मिळू लागला. मुख्य म्हणजे दुर्मीळ पाणभाज्या, कंद यांची चव लोकांना पुन्हा चाखायला मिळाली.

शालू यांनी त्यानंतर स्त्रियांना आर्थिक सक्षम करण्याचा चंगच बांधला. हळहळू त्यांनी ग्रामपंचायती गाजविल्या. तेथे स्त्रियांचे प्रश्न मांडले. सरकारी योजना खेचून आणल्या. दोन-तीन वर्षांतच तेथील महिला गटांनी पाणवनस्पतींची बीज बँक सुरू केली. एवढेच नाही तर माशांची नवी बाजारपेठही तयार झाली. नवे, दीर्घकाळ टिकणारे पदार्थ तयार केले जाऊ लागले. त्यातलं ‘माशांचं लोणचं’ सर्वाधिक लोकप्रिय आहे. गावाबाहेरच्या बाजारपेठांचा शोध सुरू झाला. मात्र ही वाट सोपी नव्हती. गाव आणि समाजातून त्यांच्या स्त्री-नेतृत्वाला प्रचंड विरोध झाला, मात्र पती जगदीश कोल्हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळे त्या पाऊल पुढेच टाकत राहिल्या.

बारावी शिकलेल्या शालू यांनी जिऱ्या एवढ्या माशांच्या बीजाचं संगोपन करून नंतर ते तलावात टाकून मोठे केले. मात्र, त्यांची कुठे आणि कशी विक्री करायची हे मोठे आव्हानही त्यांनी समर्थपणे पेललं. शालू यांनी ४३ गावांतल्या १६-१६ स्त्रियांच्या २२ गटांना यासाठी प्रशिक्षित केलं. १२ गावांत १२ जैविक मित्र तयार केले. १२ मासेमारी सोसायटीमार्फत ७५ तलावांचं पुनरुज्जीवन केलं. त्यातील मासे आणि पाणवनस्पतींमुळे पहिल्याच वर्षी त्यांच्या ग्रामपंचायतीला दोन लाख ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळालं हे विशेष.

तलावांच्या संवर्धनाची धुरा पेलताना स्थानिक स्त्रियांमध्ये आत्मविश्वास, न्याय, हक्क आणि समान अधिकाराचं बीजारोपण शालू यांनी केलं. केवळ तलाव खोलीकरणाचा उपयोग नसून तेथील जैवविविधता, त्याद्वारे रोजगारनिर्मिती महत्त्वाची असते, असाही संदेश दिला. जैविक शेती, शेतीपूरक जोडधंदे निर्माण करून स्त्रियांबरोबरच गावांना विकासाच्या मार्गावर आणून सोडणाऱ्या शालू कोल्हे यांना ‘लोकसत्ता’चा प्रणाम. kavitanagapure@gmail.com