दिगंबर शिंदे
लम्पी या पशूंमधील संसर्गजन्य रोगाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रसार होऊ नये म्हणून जनावरांचे बाजार, शर्यती, प्रदर्शन यावर प्रतिबंध घालण्यासारखे उपाय सुरू केले आहेत. या काळात जनावरांची काळजी काय घ्यावी, उपचार कसे करावेत हे सांगणारा हा लेख.
राज्यात दुसऱ्यांदा पशूंमध्ये लम्पी या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून, प्रसार कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून खबरदारी घेतली जात आहे. जनावरांचे बाजार, शर्यती, पशुधनाची वाहतूक यावर बंधने घालण्यात आली असून, पशुपालकांनीही या रोगाला आळा घालण्यासाठी लसीकरणाबरोबरच अन्य खबरदारीही घेणे गरजेचे आहे. एप्रिलपर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या लम्पी या पशूमधील संसर्गजन्य रोगाने जुलैपासून डोके वर काढले असून राज्यातील २५ जिल्ह्यांत या रोगाची साथ झपाटय़ाने पसरत आहे. राज्यात सुमारे एक कोटी ४० लाख गोवंश पशुधन असून यातील शेकडो जनावरे या रोगाला बळी पडू लागले आहेत. एकटय़ा सांगली
गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन त्यांची योग्य शुश्रूषा करणे गरजेचे आहे. २० टक्के औषधोपचार व ८० टक्के शुश्रूषा या सुत्रानुसार लम्पी चर्मरोगावर मात करता येते. पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घेऊन उपचार घेतल्यास लम्पी चर्मरोगापासून पशुधन वाचविण्यात यश मिळते.
हेही वाचा >>>भूसूक्ष्मजीवशास्त्र आधारित संशोधन हवे!
आहारविषयक काळजी
रोगी जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे जनावरांचा आहार व पाणी पिणे उत्तम राहील यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी. आजारी जनावरांना हिरवा, मऊ व लुसलुशीत चारा, तसेच चांगल्या प्रतीचा प्रथिने व ऊर्जायुक्त खुराक (ढेप/ मका आदी) द्यावा. पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात वारंवार उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ टाकून दिल्यास जनावर पाणी आवडीने पितात. तसेच त्यांना खनिजक्षार व ऊर्जा मिळेल. थंडीच्या काळात हलके कोमट पाणी दिल्यास जनावर आवडीने पाणी पितात. पाणी पिणे चालू राहिल्यास अत्यवस्थ जनावरसुद्धा तंदुरुस्त होते.
ज्या बाधित जनावरांना मान, पाय, छातीवरील सुजेमुळे मान खाली करता येत नाही, अशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे. गरजेप्रमाणे चारा हाताने खाऊ घातल्यास रोगी जनावर चारा खात असल्याचे दिसून आले आहे.
पूरक खाद्यपदार्थाचा अंतर्भाव
आजारी जनावरांनी चारा खाणे कमी केले असेल, तर अशा जनावरांना ऊर्जावर्धक (प्रोपायलिन, ग्लायकॉल) औषधे तोंडावाटे देण्यात यावीत. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे जीवनसत्त्वे, खनिजक्षार मिश्रण, प्रतिकारशक्तिवर्धक तसेच यकृतवर्धक औषधे देण्यात यावीत. रक्तक्षय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळी, संध्याकाळी किमान २१ दिवस देण्यात यावीत. ओटीपोटातील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत राहण्यासाठी प्री व प्रोबायोटिक औषधे त्याचप्रमाणे भूकवाढीसाठी औषधे देण्यात यावीत. आजारी जनावरांना औषधे पाजणे शक्यतो टाळावे. पावडर किंवा पातळ औषधे ही कणिक / पीठ / गुळ खुराक किंवा पाण्यातून देण्यात यावीत.
उबदार निवारा
जनावरांचे पाऊस व थंडीपासून संरक्षण करावे. जनावरे उघडय़ावर बांधू नयेत. जनावरांना योग्य तो कोरडा व ऊबदार निवारा उपलब्ध करून द्यावा व त्यांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करावे. लहान वासराना अंगावर उबदार कपडे पांघरावेत. गोठय़ात अधिक वॅटेजचे बल्ब लावावेत जेणेकरून उष्णता निर्माण होईल व प्रतिकूल वातावरणामुळे येणारा ताण टाळता येईल.
हेही वाचा >>>‘इस्रो’मधील अनेक पिढय़ांचे योगदान!; ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर अध्यक्ष सोमनाथ यांचे उद्गारचंद्रयमिशन चंद्रयानान
पोळी पायावरील सुजेवर शेक देणे
ज्या जनावरांना पायासमोरील लसीका ग्रंथीवर, पायावर किंवा छातीवर सूज आहे, अशा जनावरांना बसताना त्रास होतो म्हणून ती कित्येक दिवस उभी राहतात. अशा जनावरांना मीठाच्या संतृप्त (मीठ पाण्यात विरघळणे बंद होईपर्यंत बनवलेले पाणी) गरम द्रावणाचा सुती कापडाच्या साहाय्याने दिवसातून दोन वेळा उत्तम शेक द्यावा. तसेच मॅग्नेशियम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लिसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ-संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते. अंगावरील गाठी व सूज कमी करण्यासाठी उन्हाच्या वेळेत गरम पाण्याची अंघोळ (शेकत / अंग चोळत) घालावी व अंग कापडाने कोरडे करावे म्हणजे सर्दी होणार नाही. लहान वासरांना चेहऱ्यावरील दुखऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करण्यास अवघड झाल्याने दूध पिता येत नाही. त्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्याने दिवसातून दोन वेळा शेक द्यावा व अंग कापडाने कोरडे करावे. गरम पाण्याचा चटका बसणार नाही याची खबरदारी घ्यावी.
बसून राहणाऱ्या जनावरांची काळजी
पायावरील, गुडघ्यावरील सुजेमुळे उभे राहण्यास त्रास झाल्याने किंवा अशक्तपणामुळे रोगी जनावर नेहमी बसून राहते. अशा जास्त वेळ बसून राहणाऱ्या जनावरांना सिमेंट काँक्रीटची जमीन टाळावी. अंगाखाली मऊ गवत / तुसाची गादी करावी. अशा बसून राहणाऱ्या जनावरांना दर २-३ तासांनी बाजू बदलावी. दिवसातून दोन वेळा मदतीने उभे करावे. पाय चोळावेत व शेकावेत.
तोंडातील व्रणोपचार
जनावरांच्या विशेषत: लहान वासरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास, तोंड पोटेशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुऊन दिवसातून ३-४ वेळेस बोरोग्लोसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर लावावे. त्यामुळे जनावराला चारा खाण्यास / वासरांना दूध पिण्यास त्रास होणार नाही.
नाकाची स्वच्छता व वाफ देणे
रोगी जनावरांच्या विशेषत: लहान वासरांच्या नाकामध्ये काही वेळा अल्सर / जखमा निर्माण होतात, नाक चिकट स्रावांनी भरलेले असते. काही वेळा तो घट्ट व कडक होतो. त्यामुळे डसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्यांनी नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी तसेच दोन्ही नाकपुडय़ांत बोरोग्लोसरीन अथवा कोमट खोबरेल व बोरीक पावडरचे मिश्रण चार-चार थेंब टाकावे. जेणेकरून मऊपणा टिकून राहील, जखमा भरून येतील व डसनासही त्रास होणार नाही. सर्दी असेल, तर निलगिरीच्या तेलाची किंवा व्हिक्सची वाफ दिली तर चांगला फायदा होतो.
डोळय़ांची निगा
डोळय़ांत व्रण असतील तर डोळय़ातून पाणी येते व पुढे पांढरेपणा येतो. त्यासाठी डोळे बोरिक पावडरच्या द्रावणाने नियमित धुऊन घ्यावेत किंवा कोमट पाण्याने साफ करावेत.
बैलांची काळजी
रोगातून बरे झालेल्या बैलांना कामास जुंपल्यामुळे रोग प्रकोप होऊन दगावत आहेत म्हणून प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांना कामास लावू नये.
जखमांचे व्यवस्थापन
बाधित जनावरांमध्ये २-३ आठवडय़ानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषता पायावरती जखमा होतात. त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून जखमा होतात. त्या जखमांवर उपचार करावा. यामध्ये जखमा ०.१ टक्के पोटेशिअम परमँगनेट द्रावणाने धुऊन घेतल्यानंतर त्यावर पोव्होडीन आयोडीन किंवा आयोडीन लावावे आणि त्यानंतर जखमेवर मॅग्नेशियम सल्फेट व ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळुवारपणे बांधावी. जखमांवर माश्या व इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे जखम परिसरात फवारण्यात यावा. जखमेमध्ये अळय़ा पडल्यास अशा जखमेत टरपेंटाईनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा आणि त्यानंतर मृत अळय़ा बाहेर काढून घ्याव्यात. अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारण्यात यावा. जखमा जास्त खोल व दूषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन पेरॉक्सॉईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून करून घ्यावा. जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे.
गोमाशांचा उपद्रव
रोगी जनावर सुस्त झाल्याने, तसेच अंगावरती जखमा झाल्याने माश्या बसतात व जनावर त्रस्त होते. रोगी जनावरांना गोचीड-गोमाश्या यांचा त्रास कमी होण्यासाठी गोठय़ात दर ३-४ दिवसांनी कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी. तसेच अंगावरती हर्बल / वनस्पतीजन्य कीटकनाशक औषधांचा नियमित वापर करावा. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये १० मिली निंबोळी तेल, १० मिली करंज तेल, १० मिली निलगिरी तेल आणि दोन ग्रॅम अंगाचा साबण मिसळावे व हे मिश्रण फवारणीसाठी वापरावे.
एकूणच बाधित जनावरांच्या उपचारादरम्यान पशुपालकांनी आपल्या पशूंची काळजीपूर्वक शुश्रूषा केल्यास अनमोल पशुधन लम्पी आजारापासून वाचविण्यात यश मिळते.
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lumpy is once again plagued by an infectious disease in animals amy