scorecardresearch

‘इस्रो’मधील अनेक पिढय़ांचे योगदान!; ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर अध्यक्ष सोमनाथ यांचे उद्गारचंद्रयमिशन चंद्रयानान

चंद्रयान-३ मोहिमेच्या या यशामागे ‘इस्रो’मधील नेतृत्व आणि संशोधकांच्या अनेक पिढय़ांचे योगदान आहे, असे उद्गार भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी काढले.

isro chandrayan 3
चांद्रयान-३ मून लँडिंग

पीटीआय, बंगळुरू : चंद्रयान-३ मोहिमेच्या या यशामागे ‘इस्रो’मधील नेतृत्व आणि संशोधकांच्या अनेक पिढय़ांचे योगदान आहे, असे उद्गार भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी काढले. या मोहिमेने संपादन केलेले हे मोठे यश हा निरंतन प्रक्रियेचा भाग असल्याचेही ते म्हणाले.

‘विक्रम’चे यशस्वी अवतरण झाल्यानंतर येथील इस्रोच्या नियंत्रण कक्षामध्ये झालेल्या जल्लोषात सोमनाथ सहभागी झाले. दूरदृष्य प्रणालीद्वारे जोडल्या गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले. ‘‘मोहीम फत्ते झाल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्याला दूरध्वनी केला आणि इस्रोमध्ये आपण करत असलेल्या कामासाठी संशोधक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. चंद्रयान-३सह यापुढे असलेल्या मोहिमांना त्यांचा भक्कम पाठिंबा मिळत आहे. देशासाठी आम्ही करत असलेल्या कार्यासाठी हे सर्वात मोठे उत्तेजन आहे.’’ या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या कोटय़वधी देशवासियांचे सोमनाथ यांनी आभार मानले. इस्रोचे माजी अध्यक्ष एस. एस. किरण कुमार यांच्यासह अनेक निवृत्त शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. ‘‘चंद्रयान-१पासून हा प्रवास सुरू झाला. चंद्रयान-२चे मुख्य यान अद्याप चंद्राच्या कक्षेत असून आपल्या संपर्कात आहे. चंद्रयान-३च्या यशाचा जल्लोष करताना या दोन मोहिमांसाठी मेहनत घेतलेल्यांची आठवणही ठेवली पाहिजे,’’ असे सोमनाथ म्हणाले.

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

चंद्रावतरण.. पुढे काय?

‘चंद्रयान-३’ मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरने बुधवारी सायंकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरण केले. चंद्रपृष्ठावर अवतरण केल्यानंतर त्याचे पुढील कार्य काय असेल त्याविषयी..

विक्रम लँडरवर बसविलेल्या ‘प्रग्यान’ या रोव्हरचा चंद्राच्या पृष्ठभागावरून आता प्रवास सुरू होणार आहे. या रोव्हरच्या साहाय्याने चंद्रपृष्ठावर असलेल्या घटकांचे रासायनिक विश्लेषणही करण्यात येईल. चंद्रपृष्ठावरील घटकांच्या परीक्षण-प्रयोगासाठी ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’वर वैज्ञानिक प्रयोग-नोंदींसाठीची यंत्रणा (सायंटिफिक पेलोड) आहे. रोव्हरच्या साहाय्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील दगड, माती, विवरे यांचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील टेकडय़ा आणि विवरांचे अचूक स्कॅन करण्याचा प्रयत्न या रोव्हरच्या साहाय्याने केला जाणार आहे. या परिसराची छायाचित्रे काढून त्याचा अभ्यास केला जाणार आहे. विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर हे एक चंद्र दिवसासाठी (१४ पृथ्वी दिवस) काम करणार आहे.

विक्रम लँडरवरील चार पेलोड 

  • ‘रेडिओ अँटोमी ऑफ मून बाऊंड हायफर सेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अ‍ॅटमोस्फेअर’ (आरएएमबीएचए) : या पेलोडच्या साहाय्याने जवळच्या पृष्ठभागावरील प्लाझ्माची (आयन व इलेक्ट्रॉन) घनता आणि वेळेनुसार त्यातील बदल मोजले जाणार आहेत.
  • ‘चंद्राज सरफेस थर्मो-फिजिकल एक्सपेरिमेंट : ध्रुवीय प्रदेशाजवळील चंद्राच्या पृष्ठभागाच्या थर्मल गुणधर्माचे मूल्यांकन प्राप्त करणार.
  • ‘इन्स्ट्रुमेंट फॉर लूनर सिस्मिक अ‍ॅक्टिव्हिटी’ (आयएलएसए) : अवतरणाच्या ठिकाणाच्या आसपास भूकंपाची गणना करेल, तसेच चांद्रपृष्ठीय कवच आणि आवरणाची छायाचित्रे टिपली जातील.
  • लेझर रेट्रोरिफ्लेक्टर अ‍ॅरे (एलआरए) :याद्वारे चंद्राची गतिशीलता समजून घेतली जाईल. ते पृथ्वीच्या एकमेव नैसर्गिक उपग्रहाचे कक्षीय वर्तन आणि त्याचा ग्रहावर होणारा परिणाम समजून घेण्यास मदत करणार. या पेलोडला सात संवेदक (सेन्सर) आहेत. तसेच ‘लँडर’ला असलेले संभाव्य धोके शोधणे आणि टाळण्यासाठी त्यावरील अद्ययावत कॅमेरा मदत करणार आहे.

‘प्रग्यान’ रोव्हरमधील दोन पेलोड

  • ‘अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर’ (एपीएक्सएस) : चंद्रावरील अवतरण पृष्ठभागाच्या सभोवतालची माती आणि खडकांची मूलभूत रचना यांची तपासणी करणार. खडकातील लोह, मॅग्नेशियम, अ‍ॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आदी मूलद्रव्यांचे विश्लेषण करणार आहे.
  • ‘लेसर इंडय़ुस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप’ (एलआयबीएस) : चंद्रपृष्ठाच्या रासायनिक रचना आणि खनिज रचनांचा अभ्यास करणार आहे.

‘प्रोपल्शन मॉडय़ूल’मधील पेलोड

स्पेक्ट्रो- पोलारिमेटरी ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (एसएचएपीई) : चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मोजमापांचे परीक्षण करेल. हे पेलोड पृथ्वीच्या वातावरणाचा स्पेक्ट्रोस्कोपिक अभ्यास करणार आहे. पृथ्वीवरील ढगांच्या ध्रुवीकरणातील फरक मोजेल आणि इतर ग्रहांचा अभ्यास करणार आहे. या शिवाय ‘प्रोपल्शन मॉडय़ूल’वर ‘स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ’ही शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी उपयुक्त सामग्री असेल. त्याद्वारे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या विविध प्रकारच्या मोजमापांचा अभ्यास केला जाईल. हे संशोधन या मोहिमेतील आणखी एक जमेची बाब (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) असेल.

‘पृथ्वीवर संकल्प, चंद्रावर पूर्ती’

नवी दिल्ली :  ‘चंद्रयान ३ चंद्रावर उतरण्याचा क्षण ऐतिहासिक असून विकसित भारतासाठी वाजवलेला हा बिगुल आहे,’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रयानाच्या अवतरणप्रसंगी काढले. चांद्रमोहिमेच्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करताना पंतप्रधानांनी ‘पृथ्वीवर भारताने एक संकल्प केला आणि चंद्रावर त्याची पूर्तता केली’ असेही म्हटले.

‘ब्रिक्स’ देशांच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे इस्रोच्या ‘इस्ट्रॅक’ नियंत्रण कक्षाशी संपर्क केला.  ‘मी ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत असलो तरी माझे हृदय आणि आत्मा भारतातच आहे’ असे मोदी म्हणाले. आजवर कोणत्याही देशाला जमले नाही ते भारताने करून दाखवले, असे सांगतानाच ‘आता चंद्रपथावर चालण्याचा काळ आला आहे’ असे पंतप्रधान म्हणाले.

‘चांद्रमोहिमेचे हे यश केवळ भारताचेच नाही. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा भारताचा दृष्टीकोन जगभर गाजत असून या मानवकेंद्रीत भूमिकेवरच चांद्रमोहीम आधारलेली आहे. त्यामुळे या यशाचे श्रेय मानवतेला आहे,’ असे ते म्हणाले. त्याचवेळी ‘नव्या भारताची नवी भरारी आपण अनुभवत आहोत. नवा इतिहास घडवत आहोत. हे अतुलनिय यश भारत जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषवत असताना मिळाले,’ असे प्रशंसोद्गारही पंतप्रधानांनी काढले.

देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा – मुख्यमंत्री  

आपला देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.  भारताच्या चंद्रयानाचे विक्रम हे लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदोत्सव साजरा केला तसेच उपस्थितांना पेढेही वाटण्यात आले. यावेळी शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त करताना, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे..  या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला असून देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश असल्याचे  गौवरोद्गार त्यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचे आणि पाठिंब्याचे बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे.   भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे.

नवभारताचा नवीन विक्रम – देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवभारताने नवीन विक्रम केला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरविणारा पहिला देश ठरला आहे. मोदी यांनी वैज्ञानिकांना पाठिंबा दिल्याने नवभारताचे नवे स्वरूप पहायला मिळत आहे. मोदी यांनी विश्वास निर्माण केला असून जगाच्या इतिहासात आजचा भारताचा दिवस म्हणून गणला जाईल. इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन.

भारतासाठी अभिमानाची बाब- शरद पवार

चंद्रयान ३ हा भारतीय अवकाश विभागाचा एक महत्त्वाचा टप्पा असून भारतीय वैज्ञानिक समूहाचा आत्मविश्वास वाढवणारी ही  घटना आहे. या यशाने भारतासहित संपूर्ण जगाला अभिमान वाटावी अशी ही कामगिरी झाली आहे. या कामगिरीसाठी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे.

२०१९साली चंद्रयान-२ मोहिमेतील लँडर चंद्रपृष्ठावर कोसळल्यानंतर त्यावेळी नियंत्रण कक्षात उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी इस्रोचे तत्कालिन अध्यक्ष सिवन यांचे सांत्वन केले होते. चंद्रयान-३च्या यशानंतर समाजमाध्यमावर अनेकांनी या क्षणाची आठवण काढली.

हे अतुलनीय यश पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सूक होतो. या क्षणाची आपण चार वर्षे वाट पाहिली. आताचे यश ही सगळय़ा देशासाठी सर्वात गोड बातमी आहे. जगातील पहिल्या चार अंतराळ संशोधन संस्थांमध्ये आता भारताचे नाव आहे. – के. सिवन, माजी अध्यक्ष, इस्रो

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After the success of chandrayaan 3 mission president somnath exclamation ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×