जीवन गौरव

प्रसंग एक :

तर बरं का, आमच्या आत्याच्या मालकांनी बांधलेल्या घराचे नाव ‘भगीरथ’. तिनेच सांभाळलं असल्यानं अनेकदा या नावाचा उल्लेख घरात होत असे. कुतूहलाने भरलेलं पाच-सहा वर्षांचं वय, नावाला अर्थ असतात वगैरे ताजं ज्ञान मिळालेलं. मग वाडय़ातल्या एका तरुण मित्राने सांगितलं, की भगीरथ नावाच्या राजानं अत्यंतिक प्रयत्नांतून शंकराच्या डोक्यावरची गंगा पृथ्वीवर आणून कुणाचा तरी उद्धार वगैरे केला. त्यामुळे अत्यंतिक प्रयत्नांना भगीरथ हे नाव पडलं. भगीरथ प्रयत्न! आमच्या मामांनी खरं तर आपल्या मातोश्रींच्या भागीरथी नावावरून ‘भगीरथ’ हे नाव दिलं होतं. पण घर बांधायला त्यांनाही कष्ट पडलेच होते अन अनायासे दुसऱ्या अर्थीही नाव चपखल बसत होतं. या ज्ञानानं मला कोण आनंद झाला होता आणि हे ज्ञान कुणालाच फक्त आपल्यालाच प्राप्त आहे अशा बालबुद्धीने मी ते पाजळत होतो काही काळ.

प्रसंग दोन :

पुढे त्याच घरी राहताना खरोखर भगीरथ प्रयत्न करून घरात पाणी आणावं लागे. टँकरवर चढून फटाफट पाणी शेंदण्यात मी बहाद्दर होतो. अन् दिवसाआड येणाऱ्या या टँकरची मी आतुरतेने वाट पाही ती आपले हे शेंदण-कसब दाखविण्याकरिताच. त्यानंतर धनकवडी नावाच्या पुण्याच्या उपनगरात जिथे भगीरथ उभं होतं, तिथपर्यंत मुन्सिपाल्टीची पाणीयोजना आली आणि आर्थिक ओढगस्तीमुळे त्याकरीता भरावयाच्या पैशांकरिता पुन्हा भगीरथ प्रयत्न घडले ते या भगीरथामध्येच.

प्रसंग तीन :

कट टू एकदम लातूर! तेच ते! जिथे पाण्याची रेल्वेगाडी पाठवावी लागली होती. वस्तुत: त्या गावी निजामकालीन मोठी बाजारपेठ व व्यापार उदीम! इतकंच काय, पण डाळमिला वगैरे पूर्वापार. परंतु गाव फेमस झालं ते मात्र पाण्याच्या रेल्वेगाडीनं. (मी स्वत: तिथेच शिकलो या तपशिलास पुरेशी प्रसिद्धी न मिळाल्यानंही रेल्वेगाडी जाईस्तोवर वाट बघावी लागली लातूरला.) असो.

तर बरं का, शिकत असताना कडक उन्हाचा त्रास वाचवायला आम्ही काही विद्यार्थी कॉलेजास लगटून असलेल्या शेतातल्या विहिरीत पोहायला जात असू. हो, हो लातूरलाच! पाणी असे. भरपूर. तर एकदा आम्ही उडय़ा मारल्या म्हणून आमच्या एका मित्रानंही मारली उडी पाण्यात. पण पोहता येत नसल्याने बुडू लागला. शेतकरी काठीच बसला होता आणि त्यानं चातुर्यानं स्वत: न किंचाळता, उडी न मारता एका लांब काठीनं पोरास बाहेर काढलं. विचारपूस केली असता, ‘मला वाटलं आपोआपच तरंगतात,’ असं अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या मित्राने सांगितलं. आम्हालाही ते तितकं मूर्ख न वाटता भाबडे वाटलं.

प्रसंग चार :

हा अलीकडचा एक इन्सर्ट अमरावतीचा! जळू गावचा प्रसंग. भयंकर उन्हात ‘गाभ्रीचा पाऊस’ करायचा म्हणून तिथे गेलो असता, एरवी सिंचन, दुष्काळ, नापिकी अन् काय काय कारणांमुळे घरोघरी आत्महत्या झालेल्या गावात अमनधपक्या बदाबदा पाऊस! कॅमेरादी साहित्य वाचवता वाचवता एकच तिरपीट. बरं लागून राहिला नं राजेहो पाऊस. पार चित्रपट रद्द करायच्या गोष्टी करू लागले निर्माते न सगळेच. मी म्हणलं, एक दिवस थांबा अन् कसं काय की पण जमलं.

तर बरं का, इतका सगळा फ्लॅशबॅक टाकायचं कारण काय असावं असं वाटतंय तुम्हाला? छे! आत्मचरित्र वगैरे नाही हो. आणि लक्षुम्बाई टिळकांनी एकवार स्मृतिचित्रे लिहिल्यावर म्या वानरान काय श्टोरी सांगायची हो लाइफची! छय़ा! तसलं काही नाही. हा सगळा इतिहास आठवायचं कारण की, डायरेक फोन आला! ‘तुम्हाला पाणी फौंडेशनच्या टीवीवरच्या कार्यक्रमाचा भाग व्हायला आवडेल का? आठ भाग घेतील वगैरे वगैरे’ असा निरोप. गडी चाट पडला. (म्हणजे मीच) नाही म्हणायला ‘दंगल’ चित्रपटामुळे आमीरशी परिचय झाला होता आणि पुन्हा आठवण काढावी इतपत मी बरा वागलो होतो, त्यामुळे ती संगती लागली. पण पाणी? त्याचा न् आपला काय संबंध? असा विचार करता करता पाण्याशी झालेले एकेक एन्काऊंटर आठवले तर तेच हारीनी मांडलेत वर.

अहो, भांडी घासताना नळ फुल्ल चालू ठेवणारं गाव आमचं. एखाद वेळी पावसानं ओढ दिल्यावर एकवेळचं पाणी येतं या दु:खात पिचणारं! तर अशा पुण्यात जन्म काढलेल्या मला ‘इतरांना सतत मोडीत काढायचं’ ही अक्कल होतीच. म्हणजे ती येतेच गावगाडय़ातून.

तर मी म्हटलं, ‘आता हे काय नवीन नाटक? पाण्याबिण्याचं? प्रतिमासंवर्धनासाठी की काय? पैसे वगैरे देणार की ‘सामाजिक’?’ तर अशा शंकांचं आणि अज्ञानाचं काहूर घेऊन खानसाहेबांच्या घरी आयोजित बैठकीत पोचलो. माझ्यासह आमच्या लाइनीतले सुनील, सई, अनीता, भारत, जितू आणि प्रतीक्षा आदी मंडळी होती. आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ ही पाणी फौंडेशनची संस्थापक मंडळीही होती. अतिशय साधेपणाने आमीर आणि सत्यजितने आम्हाला विषय समजावून सांगितला.

‘सत्यमेव जयते हा कार्यक्रम करत असताना पाणी हा विषय समोर आला. प्रश्नाची व्याप्ती अन गांभीर्यामुळे मनात राहिला. यथावकाश महाराष्ट्रातले सातत्यपूर्ण दुष्काळ व ते दूर करण्याचं सामर्थ्य हरवलेला समाज असं चित्र पुढे आलं. यावर तातडीने काम करायला हवं असं वाटलं. प्रश्न इतका जटिल आणि जून होता की तो सोडविण्याचा विचारही आव्हानात्मक आणि भयचकित करणारा होता. आपल्याला हे जमेल का? हे कधीच न केलेलं काम अंगावर घ्यावं का? आपण एकटय़ानं काही करून चालणार नाही तर एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत. मग व्यवस्था, समाज बरोबर येतील का? कार्यकर्ते मिळतील का?’ ई. अनेक प्रश्नांना अंगावर घेत या तिघांनी हे काम करायचं ठरवलं. कसं अन् काय करावं याची दिशा सापडली साताऱ्यातल्या एका कामात. डॉ. अविनाश पोळ या कलंदर माणसानं श्रमदान नावाचं एकच सूत्र वापरीत अजिंक्यतारा किल्ल्याचा कायापालट केला होता. मोजके जोडीदार अन् त्यांची श्रमनिष्ठा या भांडवलावर हिरवाई फुलवली होती. त्यांना सहभागी करून घेण्यात आलं. सर्वानी मिळून कृती कार्यक्रमाचा आराखडा तयार केला आणि लोकनियुक्त सरकारचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी फारच उत्साहाने पाठिंबा दर्शविला व सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले. आणि काम सुरू झालं.’

भगीरथाची कथा विस्तारानं आणि तपशिलासह प्रथमच ऐकायला मिळत होती. सगळे आम्ही गुंगून गेलो ऐकण्यात. समस्येविषयीचं अज्ञान दूर केलं आणि शास्त्रशुद्ध प्रयत्नांचं प्रशिक्षण मिळालं तर माणूस हर समस्या सोडवू शकतो हे साधं सूत्र वापरून कार्यक्रमाची आखणी केली होती. कार्यक्रम होता ‘वॉटर कप’ स्पर्धेचा! गावात पाणी आणण्याची स्पर्धा! वा! कल्पनेत नवता तर आहेच पण त्याहीपेक्षा

समस्येचं कालसुसंगत अवलोकनही आहे.

साधारण ९२ नंतर भौतिक संपन्नता आणि यश नावाचे ससे मारण्याचं बेगुमान शिकारीपण अंगीकारून निसर्ग ओरबाडणाऱ्या समाजास व्यक्तिगत स्वार्थाच्या पाशातून सोडवून समष्टीच्या कल्याणापर्यंत घेऊन जाण्याचं स्वप्न जसं दडलं आहे, या कल्पनेत तसेच निसर्ग अन् माणूस या दोहोंची पुनस्र्थापना करण्याचं सामर्थ्यही.

मी हरखून गेलो. सत्यजित अन् आमीर ही खूप पूर्वीपासूनच प्रेरणास्थानं आहेत. ‘लगान’ नावाचा चित्रपट करणारे आमीर, किरण आणि तो कसा केला हे उलगडून सांगणारं पुस्तक लिहिणारा व माहितीपट बनवणारा सत्यजित.

‘वळू’ हा आमचा पहिला चित्रपट बनवायची धडपड दोन वर्ष चालू होती, पण वाट दिसत नव्हती. अन् हे ‘लगान’ची निर्मितीकथा असणारं पुस्तक इतकं प्रेरक ठरलं की वाचल्यानंतर वर्षभरात आम्ही चित्रपट तयार केला.

असो. तर आता पुन्हा एकदा या दोघांनी भारून टाकलं. ‘वॉटर कप ही केवळ स्पर्धा नसून लोकचळवळ होण्याचं अनुस्युत सामर्थ्य असलेला एक कार्यक्रम आहे,’ सत्यजित सांगत होता. लोकसहभागाशिवाय इतक्या मोठय़ा समस्येचं निराकरण केवळ अशक्य आहे.

आजवर व्यवस्थेमार्फत आभाळभर पैसा खर्च झाला पण पाणी मिळाले नाही. महाराष्ट्रातल्या काही प्रयोगशील व्यक्तींनी काही देखणे प्रयोग करून गावपातळीवरची यशसिद्धी प्राप्त केली. तरी हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी ही दोनच गावं सर्वामुखी झाली. पोपटराव पवार, अण्णा हजारे, कै. विलासराव साळुंखे (पाणी पंचायत), कै. मधुकर धस (दिलासा), कै. मोहन धारिया (वनराई) अशा माणसांनी या समाजाच्या साचलेपणास आव्हान देत नव्या कल्पना मांडल्या आणि परिसर विकास केला. पाण्यासंबंधी या सगळ्यांचं काम दिशादर्शक अन् प्रेरक आहे. तरीही या उज्ज्वल उदाहरणांचं सार्वत्रिकीकरण झालं नाही. व्यवस्थेनं त्या-त्या माणसांचा आदर केला, पण त्यांच्या प्रयत्नांचा, कल्पनांचा अंगीकार मात्र केला नाही. हा सगळा इतिहास अभ्यासून वॉटर कपची आखणी केलीये.

‘तर बरं का, गावानं ग्रामसभा घेऊन स्पर्धेत भाग घेण्याचं एकमुखानं ठरवायचं. मग गावातील पाच माणसं, ज्यात दोन स्त्रिया अनिवार्य, प्रशिक्षणाला पाठवायची. पाणी फौंडेशनने सिद्ध केलेल्या प्रशिक्षण केंद्रात ‘पाण्या’बद्दलचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचं. ‘माथा ते पायथा’ ही पद्धत राबवून जमिनीवर उपचार करायचे. यातले बहुतांश श्रमदानाने करायचे, तर काही यंत्राने. ४५ दिवसांत पावसाच्या स्वागतासाठी गावाला तयार करायचं. ऐकताना सहज सोप्पं वाटणारं हे काम प्रत्यक्षात समूहाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा मागणारं आहे. पण मागच्या खेपेचा अनुभव उत्साह वाढवणारा आहे.’

‘मागच्या खेपेचा?’ मी.

‘होय. स्पर्धेची सुरुवात २०१६ साली तीन तालुक्यांतील शंभरावर गावांत झाली. हा पहिला प्रयत्न असल्याने मर्यादित स्वरूप होतं. पण प्रतिसाद आणि परिणाम दोन्ही फारच उत्साहवर्धक आहेत.’

म्हणजे महाराष्ट्रात असा एक अनोखा प्रयोग होतोय हे माझ्या गावीही नव्हतं तर. मला खेद वाटला. पण निदान दुसऱ्या वर्षी तरी आपल्याला सहभागी होता येतंय याचं बरंही वाटलं.

‘या दुसऱ्या वर्षी (२०१७) ३० तालुक्यांत अन् बाराशे गावांत स्पर्धा होतेय. त्या सगळ्याची माहिती देणारा कार्यक्रम आपण करतोय. नाव आहे ‘तुफान आलंया’! यात तुम्ही कलाकार चमू एकेका विभागाचं प्रतिनिधित्व करायचं. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अन् मराठवाडा असे ते तीन विभाग..! खरं सांगायचं तर हजारोंच्या संख्येनं रणरणत्या उन्हात राबणाऱ्या त्या गावकऱ्यांच्या श्रमाची प्रतिष्ठा पुनस्र्थापित करायची आहे. त्यांचं कर्तृत्व साजरं करायचं आहे.’

विचारांचं एक तुफान घेऊनच बाहेर पडलो. सहजपणी दोन संवेदनशील माणसं एकत्र बसतात अन् अवघ्या महाराष्ट्राच्या दुष्काळ निवारणाचं स्वप्न पाहतात! बरं तेही भाबडेपणानं वा स्वप्नाळूपणे नव्हे, तर ठोस वैज्ञानिक प्रयत्नांवर दृष्टी खिळवून. एका अनेकलक्ष्यी सामाजिक प्रयोगाची अभ्यासपूर्वक आखणी करून. इतकंच नव्हे तर फारच अफलातूनरीत्या या कार्यक्रमास सर्वसमावेशक करीत.

सामान्यत: समूह एकत्र आला की विध्वंसक होण्याचा परिपाठ असलेल्या समाजात समूहांनं सृजन करायचा ध्यास घेतलेली ही मंडळी फारच आश्वासक वाटली.

मी जितूला म्हणलं, ‘हे भारी काम आहे रे.’ जितू त्याच्या कडेलोट प्रेमळ भाबडेपणानं केव्हाच काळजाचं पाणी करून बसला होता. मला म्हणाला, ‘गिऱ्या, मी प्रशिक्षणाला गेलो होतो. आपल्या गावात पाणी आणायचं स्वप्न घेऊन आलेली हजारो माणसं मी प्रत्यक्ष पाहिलीयेत. माझा विश्वास वाढलाय कवितेवरचा, स्वप्नावरचा!’

मौखिक परंपरेतून आलेलं अगणित ज्ञान आम्ही कोरडं राहत वाहून जाऊ  दिलं. पण एखादी चुकून मागे राहिलेली भगीरथाची गोष्ट जेव्हा नवा अन्वयार्थ लेऊन शापदग्ध सगरपुत्रांनाच भगीरथ होण्याचं सामर्थ्य देत साकार होताना दिसते, तेव्हा वाढतोच विश्वास माणसाच्या माणूस बनण्याच्या प्रयत्नांवरचा! कवितेवरचा! स्वप्नांवरचा!

लवकरच मला याचा दृष्टांती अनुभव मिळायचा होता. त्याची श्टोरी पुढच्या रविवारी.

कोणत्या कामासाठी किती गुण?

‘वॉटर कप’ या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या गावांना त्यांनी दिलेल्या योगदानानुसार मुल्यमापन करून १०० पैकी गुण दिले जातात. या गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे केली जाते. शोष खड्डय़ांसाठी ५ गुण, नर्सरी/ रोपवाटिकेसाठी ५ गुण, श्रमदान/मनुष्यबळाचा वापर करून बांधलेले बंधारे आणि जलसंधारण रचना यासाठी २० गुण, यंत्राचा वापर करून बांधलेले बंधारे आणि जलसंधारण रचना यासाठी २० गुण, एरिया ट्रीटमेंट आणि रिज (माथा) उपचारांवर योग्य भर यासाठी १० गुण, रचनांची/कामांची गुणवत्ता यासाठी १० गुण, मूलस्थानी/‘इन सिटू’ मृदा उपचार यासाठी १० गुण, पाणी बचत तंत्रज्ञानासाठी ५ गुण, वॉटर बजेटसाठी ५ गुण, अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचनांची दुरुस्ती/विहीर पुनर्भरण/नावीन्यपूर्ण उपक्रम यासाठी १० गुण देण्यात येणार आहेत.

 (क्रमश:)

 

सहभागी महसुली गाव/ग्रामपंतायतींना निर्देशित घटकांतर्गत एकूण १०० गुणांपैकी पुढीलप्रमाणे गुण दिले जातील.

अनु. क्र.        घटक                                                                                                                    गुण

१.     शोष खड्डे                                                                                                                                  ५

२.     नर्सरी/ रोपवाटिका                                                                                                                     ५

३.     श्रमदान/मनुष्यबळाचा वापर करून बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण रचना                            २०

४.     यंत्राचा वापर करून बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण रचना                                                      २०

५.     एरिया ट्रीटमेंट आणि रिज (माथा) उपचारांवर योग्य भर                                                              १०

६.     रचनांची/कामांची गुणवत्ता                                                                                                        १०

७.     मूलस्थानी/‘इन सिटू’ मृदा उपचार                                                                                               १०

८.     पाणी बचत तंत्रज्ञान                                                                                                                      ५

९.     वॉटर बजेट                                                                                                                                    ५

१०.    अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचनांची दुरुस्ती /विहीर पुनर्भरण/

नावीन्यपूर्ण उपक्रम                                                                                                                       १०

एकूण                   १००

गिरीश कुलकर्णी