दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ‘लम्पी त्वचा’ हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला, तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी त्वचा रोगाच्या संसर्गापासून वाचविता येईल आणि जरी प्रादुर्भाव झालाच तर कमीत कमी नुकसान कसे होईल, याची तरतूद करता येईल.

आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळय़ातून व नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथींना सूज येते. सुरुवातीस ताप येतो. दुधाचे प्रमाण वेगाने कमी होते. अनेकदा गाय, म्हैस दूध देणेच बंद करतात. जनावरांचे चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू डोके, मान, मायांग, कास आदी भागाच्या त्वचेवर १०-५० मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळय़ातील व्रणामुळे चिपडे येतात. तसेच डोळय़ांची दृष्टी बाधित होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात.

सन २०२० मध्ये राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये, तसेच २०२१ मध्ये १० जिल्ह्यांत लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव आढळून आलेला होता. सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्ली या राज्यात पशुधनामध्ये रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झालेला आढळून येत आहे. पंजाब, हरियाणातील दूध संकलन २० टक्क्यांनी कमी झाले आहे. या दोन राज्यांत पशुपालकांना मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

यंदा राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पी त्वचा रोगसदृश रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राज्यामध्ये अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या राज्यातील एकूण ७१ गावांमध्ये लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील ३०१ गावांतील एकूण १ लाख ३४२ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावांतील एकूण ७६२ बाधित पशुधनापैकी एकूण ५६० पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ९ व पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील १ असे एकूण १० बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे.

पशुपालकांनो अशी काळजी घ्या..

लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये, याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठय़ांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येऊ नये.

बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. तसेच गोठय़ात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. त्याकरिता १ टक्के फॉर्मलीन किंवा २-३ टक्के सोडियम हायपोक्लोराइट, फिनॉल २ टक्के यांचा वापर करता येईल. 

या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डय़ात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. या रोगाचा प्रसार बाह्य कीटकांद्वारे म्हणजे डास, माशा, गोचीड आदींद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठय़ात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी. 

रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधित गावांपासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व महिष वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे. रोगप्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी.

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ४ (१) अनुसार पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी तातडीने या बाबतची माहिती जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

येथे साधा तातडीने संपर्क

जनावरांमध्ये या आजाराचा संसर्ग अत्यंत वेगाने होत असल्यामुळे रोगसदृश लक्षणे आढळल्यास जवळचे सरकारी, खासगी पशुवैद्यक, पशुवैद्यकीय संस्थांशी तातडीने संपर्क साधावा. पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर तत्काळ संपर्क साधावा.

आफ्रिकेतून लम्पीचा उगम

‘लम्पी’ त्वचा रोग हा रोग इ.स. १९२९ पासून १९७८ पर्यंत मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता. त्यानंतर इतर देशात त्याने शिरकाव केला. सन २०१३ नंतर या रोगाचा वेगाने सर्वदूर प्रसार झाला आणि आता हा रोग अनेक युरोपीय आणि आशियाई देशात पसरला आहे. भारतात ‘लम्पी’ त्वचा रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला. महाराष्ट्रात प्रथम या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यात (सिरोंचा) मार्च २०२० या महिन्यापासून झाला होता. नंतर विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही जिल्ह्यात सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. या वर्षी गुजरात राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषत: गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये होऊ नये आणि त्याचा प्रसार महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

dattatay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treatment of lumpy skin disease in cattle zws
First published on: 06-09-2022 at 01:57 IST