मी मेडिकलचं पुढील शिक्षण घेण्यासाठी कॅनडा आणि नंतर इंग्लंडला गेलो. तिथे तीन-चार वर्षांच्या काळात प्रचंड चांगली नाटकं पाहिली. ही नाटकं पाहताना काही गोष्टी प्रकर्षांनं जाणवल्या. नाटक करताना प्रत्येक नटाचा पोहोचायचा बिंदू एकच असतो; पण काही नट अतिशय आक्रमक, बटबटीत अभिनय करत त्या बिंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, तर काही अतिशय संयत आणि ताबा ठेवून त्या बिंदूला गवसणी घालतात. डोळ्यांची वा हातांची छोटीशी हालचालही अभिनेत्याला हवा तो परिणाम साधून देऊ शकते. त्यासाठी आक्रस्ताळेपणा करण्याची गरज नाही. ही दुसरी पद्धत मला जवळची वाटली आणि मी ती अवलंबली. भारतात परतण्याचं निश्चित केलं, तेदेखील या वेडापायी. त्यामुळे परत आल्यानंतर अभिनय क्षेत्रात कसे पाय रोवायचे, हा प्रश्न पडला नाही. एकामागोमाग एक नाटकं येत गेली. माझं पहिलं गाजलेलं नाटक म्हणजे ‘इथे ओशाळला मृत्यू’! त्यातली संभाजीची भूमिका- मला संभाजी जसा दिसला, त्या पद्धतीनं केली. ती भूमिका साकारताना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, ऐतिहासिक भूमिका करताना त्या नेमक्या कशा पद्धतीनं साकाराव्यात, याबद्दल मला तरी ठोस असं काहीच कळलेलं नाही. ती फार बटबटीत केली तर स्वत:ला पटत नाही आणि अगदी ‘एकच प्याला’मधल्या सुधाकरासारखी केली तर प्रेक्षकांना अपील होणार नाही. त्यामुळे सुवर्णमध्य काढण्याची गरज मला जाणवली. पण त्या वेळी नैसर्गिक अभिनय म्हणजे पावित्र्यभंगच समजला जायचा, हेदेखील खरं..
या साऱ्या प्रवासात मला जास्त भावलेला नाटककार म्हणजे- विजय तेंडुलकर! तेंडुलकरांनी आपण व्यवहारात वापरतो तशीच भाषा वापरून नाटकं लिहिली. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली, पण त्यांची शैली तशीच होती. मात्र, प्रेक्षकांना ती कळायचीच नाही! ‘काचेचा चंद्र’ या नाटकाच्या बाबतीत तसेच झाले. त्या नाटकाचे तब्बल २८ प्रयोग वायाच गेले. त्यात छोटे-छोटे सीन्स होते; पण प्रेक्षकांना त्या नाटकात काय चाललंय, हे कळायचंच नाही. तेंडुलकरांनी नाटकातला नाटकीपणा काढून त्यात नैसर्गिकपणा आणला होता. मी, विजयाबाई, तेंडुलकर, जब्बार आम्ही असे एकत्र आलो, त्यामुळे त्या नाटय़चळवळीला वेग मिळाला एवढंच. पण एकटय़ानंच कोणी तसं करायचा प्रयत्न केला असता, तर ते शक्य झालं नसतं..
नाटकात काम करत असतानाच मला सिनेमाची ऑफर आली आणि तीदेखील व्ही. शांताराम यांच्यासारख्या चित्रतपस्व्याकडून! पण त्याही वेळी माझं मत हेच होतं की, नाटकातला अभिनय, चित्रपटातला अभिनय असं काही वेगळं नसतं. अभिनय हा अभिनय आहे. मग तो फार तर चांगला अभिनय किंवा वाईट अभिनय, एवढाच फरक त्यात असू शकतो. त्यातही सिनेमात काम करणं म्हणजे काही तरी कमीपणाचं आहे, असं मला कधीच वाटलं नाही. नाटकाच्या आधी सिनेमा आला असता, तर लोकांनी कदाचित नाटकाला हिणवलं असतं. एक मात्र खरं की, सिनेमात टेक्निक किंवा तंत्रज्ञानामुळे हळूहळू नैसर्गिकपणा आला. पण तो यायलाही काही काळ जावा लागला. सुरुवातीचे काही चित्रपट पाहिले, तर ते म्हणजे थेट नाटकांचीच प्रतिकृती वाटावे एवढे बटबटीत होते.
तर.. ‘पिंजरा’ करतानाही मी त्यांना माझ्या अभिनयशैलीबाबत सांगितलं होतं. त्यांनी माझी नाटकंही पाहिली होती. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कधीच दबाव आणला नाही. माझं नाटक पाहून त्या वेळी ते म्हणाले होते की, ‘ही इज डिलिव्हिरग द गूड्स’! त्यामुळेच मी ‘पिंजरा’मध्ये माझ्या पद्धतीनं काम करू शकलो. एखाद्या नटानं एखादी भूमिका खूप उत्तमरीत्या साकारली, तर- ‘तो नट ती भूमिका जगला’ असं आपण सर्रास म्हणतो. पण ‘भूमिका जगणं’ हे नाटकाला आवश्यक तर नाहीच, पण हानिकारक आहे. आपण भूमिका जगायची नसते, तर ती जगत असल्याचा आभास निर्माण करायचा असतो. हे काम करणारे डॉ. लागू नसून तो अमुक अमुक आहे, असं लोकांना वाटलं पाहिजे, एवढं ते नैसर्गिकपणे साकारायचं असतं. पण हे करत असताना आपण अभिनय करत आहोत, हे भान एक सेकंदही सुटता कामा नये. हे माझ्याप्रमाणे निळूभाऊंनाही खूप उत्तम जमत असे.
नाटक.. नटासाठी की प्रेक्षकांसाठी?
अनेकदा असा वाद होतो की, नाटक हे नटानं स्वत:साठी करायचं की प्रेक्षकांसाठी? याला माझं उत्तर आहे- प्रेक्षकांसाठी! पण म्हणून नटानं स्वत्व जपायचं नाही, असंही नाही. कसं होतं की, एखादी भूमिका नटाला आवडते आणि तो विशिष्ट पद्धतीनं ती साकारतो. पण तो प्रयोग लोकांना आवडेलच असंही नाही. कधी कधी नटाला एखादं काम अजिबात आवडलेलं नसतं; पण लोकांनी ते डोक्यावर घेतलेलं असतं. अशा वेळी लोकांच्या म्हणण्याला आदर दिला पाहिजे. लोकांसाठी करतो म्हणूनच त्याला ‘प्रयोग’ म्हणतात ना. नाटक स्वत:साठी करायचं असेल, तर मग ते रंगमंचावर कशाला करायला हवं? घरी आरशासमोरही ते करता येईल. अनेकदा एखादी भूमिका आपल्याला ठरावीक पद्धतीनं करायची असते, पण ते जमत नाही. मग आपण तीच भूमिका वेगवेगळ्या पद्धतींनी साकारायचा प्रयत्न करतो. असं माझ्या बाबतीत अनेकदा झालं आहे. त्यामुळे काही बाबतींत अजूनही मी हौशी नटच आहे!
(‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षांरंभ अंकाच्या निमित्ताने साधलेला हा चिंतनबंध ‘लोकसत्ता’च्या २६ फेब्रुवारी २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.)