टी-२० विश्वचषकादरम्यान या अशा ट्रोलिंगला ऊत आला होता. विराट कोहलीचं पित्त अशा ट्रोलर्सनीच खवळलं आणि त्यानं एका
मोठय़ा मेसेजनं अनेक ट्रोलर्सची विकेट घेतली.
एखाद्याची खिल्ली उडवणे हा काही लोकांचा अगदी आवडता छंद असतो. त्यासाठी काही माणसं प्रत्येक वेळी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. समूहात अशा लोकांना चेव येतो आणि खिल्ली उडवताना मग सगळा समूह एक होतो. हास्यविनोदांना ऊत येत असतानाच कुणा एकाला टार्गेट केलं जातं. सोशल नेटवìकग साइट्स हे अशा प्रकारच्या लोकांना मिळालेलं व्यासपीठच म्हणावं लागेल!
सोशल नेटवर्किंग साइट्सवरून अशी कुणाची तरी खिल्ली उडवतात त्याला ट्रोल्स म्हटलं जातं. या ट्रोल्सना सध्या ‘अच्छे दिन’ आलेले दिसताहेत. अगदी सामान्य माणसापासून ते मोठे नेते, अभिनेते, क्रीडापटू या ट्रोल्सचे ‘बकरे’ होतात.
ट्रोल्ससाठीचं आवडतं व्यासपीठ म्हणजे ट्विटर! आलिया भट्टपासून ते आलोकनाथपर्यंत अनेक जण या ट्रोल्सचा शिकार झालेले दिसताहेत. बिग बी अमिताभ बच्चनदेखील यातून सुटलेले नाहीत. यंदाच्या टी-२० विश्वचषकादरम्यान तर या ट्रोल्सना अगदी भरतीच आलेली दिसली. याचा आरंभ झाला तो अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटने. त्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यांनतर अँड्रय़ू फ्लिंटॉफ या इंग्लंडच्या माजी खेळाडूला उत्तर देताना जो रुट या खेळाडूला संबोधून ‘जड से उखाड देंगे Root को! असं ट्वीट केलं आणि त्याला ट्रोल करणं सुरू झालं.
यापुढे जेव्हा फ्लिंटॉफने Sorry who? असं उत्तर ‘बिग बी’ला दिलं, तेव्हा ‘सर’ रवींद्र जडेजाने ‘रिश्ते में तो वों तुम्हारें बाप लगते है, नाम है शहेनशहा’ असं ट्वीट करून फ्लिंटॉफची विकेट घेतली. याच मॅचदरम्यान विराटच्या दणदणीत कामगिरीचं श्रेय अनुष्काबरोबरच्या ‘ब्रेक-अप’ला देणारे ट्रोल्स सोशल मीडियावर फिरू लागले आणि मग मात्र विराटचं पित्त खवळलं. त्याने या सर्व ट्रोलर मंडळींना ट्विटर आणि इन्टाग्रामवरून धारेवर धरलं!
क्रिकेटविश्वात ट्रोल्सची धामधूम चालू असताना बॉलीवूड कसं मागे राहील? उदय चोप्रा याच्या एका ट्वीटवर अनेकांनी त्याला ट्रोल केल्यावर त्यानेही विराटप्रमाणे ट्रोलर्सवर आगपाखड केली. या ट्रोल करणाऱ्यांना ‘A study conducted at University of Ankert, says that men who troll celebrities on Twitter have really small…. ahem! Minds’ हे उत्तर उदयनं दिलं, पण या उत्तरानं तर ट्विटरवर त्याच्याबद्दल अधिकच टिवटिवाट सुरू झाला आणि त्याच्यावर ट्रोल्सचा अगदी पाऊसच पडला.
– शांभवी मोरे