प्रेमाची गोष्ट शेअर करणारे अनेक ई-मेल्स आम्हाला मिळाले. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्यातीलच काही कपल्सचा प्रेममय प्रवास..

फेसबुकची कृपा-अथर्व फडके

माझ्या शाळेतल्या मित्रांच्या फेसबुक अकाऊंटमध्ये अस्मी होती. मी असंच मैत्री करावी म्हणून तिला रिक्वेस्ट पाठवली. सुरुवातीला ही बोलायला खूप भाव खायची. नंतर मी वेगवेगळे विषय काढून बोलायला लागलो आणि आम्ही चांगले मित्र बनलो.
मला अस्मी आवडायलाच लागली. मी तिला सरळ सांगितलं की, मी तुला आता अन्फ्रेंड करतो, कारण मला तू आवडायला लागल्येस आणि त्यामुळे आपली फ्रेन्डशिप तुटेल, कारण तुझ्या मनात तसं काही नाहीये मला माहित्येय; पण नंतर मलाच राहवलं नाही आणि मग परत मी तिला १०-१२ दिवसांत परत मेसेज केला. त्यानंतर आम्ही जस्ट कधीकधी ‘फ्रेंड’ म्हणून फिरायला वगैरे जायचो. तेव्हा कधी कधी मी तिला ‘लव यू’ किंवा ‘लाइक यू’ वगैरे म्हणायचो आणि अस्मी काहीच म्हणायची नाही. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की, अस्मीच्या मनात काहीच नाहीये आणि अचानक अस्मीचा मेसेज आला- ‘आय लव यू’. मी तिला विचारलं, ‘‘अगं, खरं सांगत्येस का?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘हो. आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झालो ना?’’ मी हसून फक्त ‘हो’ म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वो पहली नजर..  सीमा पेडणेकर
आम्ही भेटलो ९ वर्षांपूर्वी. मला आठवतही नाही तेव्हा तो कसा दिसायचा ते. १२ वीचं वर्ष होतं. आम्ही दोघे एकाच टय़ूशनमध्ये होतो; पण आम्ही एकमेकांना कधीच रजिस्टर केलं नव्हतं. माझं लक्ष दुसऱ्याच एका मुलाकडे असायचं. एके दिवशी सर उशिराने येणार म्हणून टाइमपास करत होते, इकडेतिकडे फिरत होते तेव्हा मला जाणवलं की, कोणी तरी माझ्याकडे पाहतंय. मी पटकन त्याच्याकडे पाहिलं तर तो तसाच पाहत होता. मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि इग्नोर केलं; पण मला तो त्या दुसऱ्या मुलापेक्षा इनोसंट वाटला. त्या भारावलेल्या अवस्थेत जाऊन मी मैत्रिणीकडे जाऊन पचकले की, ‘‘तो ब्लॅक टी शर्टमधला मुलगा किती इनोसंट दिसतो गं..’’ हे एवढंसं वाक्य त्या बयेला मला चिडवायला पुरेसं होतं.
दुसऱ्या दिवशी ती मैत्रीण त्या मुलाच्या बाजूलाच जाऊन बसली. मला येताना पाहून तिने गाणं गायला सुरुवात केली, ‘सागर किनारे..’ आणि माझ्याकडे पाहून हसत डोळा मारत होती. पाच मिनिटं मला काही कळलंच नाही. मग माझी टय़ूब पेटली की, त्या मुलाचं नाव सागर आहे. ना मी त्याला विचारलं ना त्याने मला विचारलं; पण आमच्या या अतिउत्साही कॉमनफ्रेंडच्या कृपेने मला असं वाटत होतं की, त्याला मी आवडते नि त्याला असं वाटत होतं की, मला तो आवडतो. एके दिवशी असाच निरोप मिळाला, तिला फोन करायला सांग. मीदेखील केला फोन. भेटायचं ठरलं.. हळूहळू मैत्री झाली नि २ डिसेंबर २००५ ला आम्ही सागर खवणेकर आणि मी रिलेशनशिपमध्ये पडलो.
सुरुवातीची र्वष दादर सार्वजनिक वाचनालय, मुंबई मराठी ग्रंथालयाच्या बाहेर पायऱ्यांवर भेटणं, मग हळूहळू शिवाजी पार्कपर्यंत येऊन पोहोचलं. स्वत:चा फोन नसताना घरच्या फोनवरून नाही तर पीसीओवरून ५ मिनिटांत बोलणं आटपणंसुद्धा मी अनुभवलंय. जेव्हा ही प्रेमाची गोष्ट माझ्या घरी समजली तेव्हा सुरुवातीला घरून स्वाभाविकपणे नकार आला. त्यामुळे मी त्याला ‘तू मला आता विसर’ वगैरे सांगितलं; पण एक दिवस मी कॉलेजला गेले असताना त्याने माझ्या आईची थेट भेट घेतली. मी घरी आले तेव्हा तो माझ्या आईसमोर बसलेला. माझ्यासाठी तो शॉक होता. तो आईशी काय बोलला, ते मला माहीत नाही; पण ती हसत होती खरी. तिच्या चेहऱ्याकडे बघून जरा जीव भांडय़ात पडला.

..भाव माझ्या मनातला – केतकी देशपांडे
आमची तशी लव्ह स्टोरी म्हणण्यासारखी फिल्मी अशी नाही. पण प्रेम व्यक्त करणं आणि तेही योग्य वेळी हे किती महत्त्वाचं असतं, ते आमच्या प्रेमाच्या गोष्टीमुळे कळू शकेल. माझी आणि आशीषची ऑफिसची शिफ्ट वेगवेगळी होती. एक दिवस काही कारणामुळे आम्हाला सगळ्यांना लवकर सोडलं आणि  आम्ही एका बसमध्ये आलो. बोलता बोलता कळलं की, आम्ही एकाच कॉलेजमध्येपण होतो. ही अशी आमची पहिली भेट. त्यानंतर मग ऑफिसमध्ये भेटणं वगैरे व्हायचं. अशातच आमचे काही कॉमन फ्रेंड्सपण निघाले. मग त्यांच्याबरोबर फिरणं, पार्टी सुरू झालं. आमच्यात मैत्रीपेक्षा जास्त काही आहे हे आम्हाला आधी कळलंच नव्हतं. थोडय़ा दिवसांनी दोघांच्या घरी लग्नाच्या चर्चा व्हायला लागल्या. त्याविषयी आम्ही आपसातही बोलायचो. त्याला मैत्रीपलीकडे इंटरेस्ट नसावा, हा विचार आला तेव्हाच,आशीषविषयी काही वाटायला लागलंय, हेदेखील जाणवलं. त्यानंतर काही दिवसांनी मला एका मुलाकडून होकार आला होता आणि त्याच्यात नकार देण्यासारखं काही नव्हतं. हे मी आशीषला सांगितलं तेव्हा मात्र त्याचा चेहरा बदलला. त्यानं त्या क्षणी विचारलं, ‘‘तुला मी लाइफ पार्टनर म्हणून चालणार नाही का? तू मुलं कशाला बघतेस?’’ मी क्षणभर गप्प; पण त्याला तातडीनं हो म्हणून टाकलं. मग घरच्यांना वगैरे सांगून लग्न झालं.
c

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love stories