‘बिईंग सायरस’ आणि ‘कॉकटेल’ असे एकदम वेगळे आणि आजच्या तरूणाईची कथा सांगणारे चित्रपट ही दिग्दर्शक होमी अदजानियाची ओळख. गेल्या काही वर्षांत इम्तियाज अली, अयान मुखर्जी आणि होमी अदजानिया सारख्या दिग्दर्शकांनी आजच्या तरूणाईचे प्रतिनिधीत्व करणारे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. ‘बिईंग सायरस’, ‘कॉकटेल’ नंतर होमी अदजानियाचा तिसरा चित्रपटही चर्चेचा विषय ठरला आहे. ‘फाईंडिंग फॅनी’ असे काहीसे विचित्र नाव असलेल्या या चित्रपटात पहिल्यांदाच दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर अशी वेगळीच जोडी पडद्यावर येणार आहे.
बिईंग सायरस हा होमीचा सैफ अली खानबरोबर पहिला चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नसला तरी समीक्षकांनी त्या चित्रपटाचे कौतुक केले. पुन्हा एकदा सैफने होमीबरोबर जोडी जमवत ‘कॉकटेल’ची निर्मिती केली आणि मुख्य व्यक्तिरेखाही साकारली.
‘कॉकटेल’च्या यशाने होमीच्या चित्रपटांना मोठा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळेच असेल सैफने होमीच्या तिसऱ्या चित्रपटासाठीही जोडी जमवली आहे पण, ती केवळ निर्माता म्हणून. सैफ अली खान आणि दिनेश विजन यांच्या ‘इल्युमिनेती फिल्म्स’ बॅनरखाली ‘फोईंडिंग फॅनी’ या भन्नाट चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
आपले लहानपणीचे हरवलेले प्रेम शोधण्यासाठी बाहेर पडलेला एक माणूस, त्याला स्टेफनी (फॅनी) फर्नाडिस आणि तत्सम चित्रविचित्र माणसांची मिळालेली साथ आणि या प्रवासात त्याच्या वाटेला आलेले अनेक गंमतीशीर अनुभव यातून फॅनीची कथा घडत जाते, अशी माहिती ‘इल्युमिनेती फिल्म्स’च्या दिनेश विजन यांनी दिली आहे.
दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर अशी हटके जोडी हे या चित्रपटाचे मोठे आकर्षण आहेच मात्र, या दोघांबरोबर नसीरूद्दिन शहा, डिंपल कपाडिया आणि पंकज कपूर यांच्यासारखे जुने कसलेले कलाकारही या चित्रपटात असल्यामुळे एकूणच ‘फाईंडिंग फॅनी’बद्दल लोकांना खूप आकर्षण आहे. फॉक्स स्टार स्टुडिओने चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी उचलली असून पुढच्या वर्षीच्या चित्रपटांमधला हा सर्वात महत्वाचा चित्रपट असल्याचे सांगण्यात येते.