देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपुरात ‘ऑटो हब’ व्हावे यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय प्रयत्नरत आहे. त्यासाठी बुटीबोरी येथे असलेल्या जागेची मागणीसुद्धा करण्यात आली आहे. राज्य शासनाने जर उद्योजकांना खास सवलत दिली तर येथे नवीन नवीन उद्योग येऊन विदर्भाचा विकास होऊन विदर्भाचा कायपालट होण्यास मदत होईल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’च्या वेळी विदर्भात उद्योग सुरू करण्यास अनेक उद्योजकांनी आस्था, आवड दाखविली होती, पण, जागतिक मंदीमुळे आणि इतर अडचणींमुळे पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून एकूण परिस्थितीत बदल होत आहे. उद्योजकांना विजेच्या दरात राज्य शासनाने युनिटमागे १ रुपया सवलत दिली आहे. ती अजून वाढवावी. ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’च्या वेळी जी आश्वासने दिली होती त्यापेक्षा किती तरी जास्त दिले तर उद्योजक येतील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.