महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महासभेत नवीन सात सदस्यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपत असल्याने नवनिर्वाचित आठ सदस्य १ मार्चपासून पदभार सांभाळतील. महापालिकेच्या स्थायी समितीची तिजोरी आता लकडगंज प्रभागाचे भाजपचे नगरसेवक बाल्या बोरकर यांच्याकडे राहणार असल्याचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी घोषित केले.
महापालिकेची आज सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या नव्या कायद्यानुसार सीमा राऊत, भावना लोणारे, मोहमंद खान, माया इवनाते, देवेंद्र मेहर, मीना चौधरी, राहुल तेलंग आणि पुरुषोत्तम हजारे या आठ सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची निवड करायची होती. त्याप्रमाणे आज सभागृहात प्रस्ताव आणल्यानंतर नागपूर विकास आघाडीतर्फे बाल्या बोरकर, विद्या कन्हेरे, संगीता गिरे आणि ईशरत निहीद मो. जलील अंसारी, पुरोगामी काँग्रस आघाडीकडून सिंधू उईके, रवींदर कौर आणि देवा उसरे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एका सदस्यांचे नाव घोषित करणे आवश्यक होते. मात्र, गटनेते प्रकाश गजभिये सभागृहात अनुपस्थित असल्याने पुढच्या सभेत राष्ट्रवादीच्या एका सदस्यांची निवड करण्यात येईल. उर्वरित आठ सदस्यांपैकी काही सदस्यांचे राजीनामे घेण्यात आले असून नागपूर विकास आघाडीकडून सुलभा चौधरी, भावना ढाकणे आणि पल्लवी शामकुळे यांची स्थायी समितीच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. अविनाश ठाकरे यांच्या कार्यकाळ १ मार्चला संपत असल्याने त्यांच्या जागी कोण येणार,  अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. रमेश सिंगारे यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र, पक्षाच्या संसदीय मंडळाने बोरकर यांचे नाव निश्चित केले.