राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागातर्फे शुक्रवार, ९ जुलैला असणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त ४ जुलैपासून खास बसेस सोडण्यात येणार आहे. जर प्रवाशांची मागणी असल्यास ४ जुलैच्या आधीदेखील बसेस सोडण्यात येतील. दरम्यान खामगाव आणि अमरावतीतून खास विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे.
 नागपूर विभागातर्फे नागपूर १, नागपूर २, उमरेड, रामटेक, काटोल तसेच सावनेर आगारातर्फे बसेस सोडण्यात येतील. पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या भाविकांनी आरक्षण गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक नागपूर, उमरेड, रामटेक, काटोल, सावनेर येथे आधीच करून घ्यावे, असे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन नागपूर विभागातर्फे करण्यात येत आहे. या विशेष बससेवेचा लाभ जास्तीत जास्त जनतेने घ्यावा. आषाढी एकादशी निमित्ताने यंदाही खामगाव व अमरावती येथून पंढरपूरसाठी विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस धावणार आहे.
यंदा ९ जुलला आषाढी एकादशीनिमित्ताने चार फेऱ्या होणार आहेत. प्रथम फेरी ३ जुलैला दुपारी ४.२० वाजता खामगाव येथील रेल्वे स्थानकावरू न, तर दुसरी फेरी ४ जुलैला दुपारी ४.२० वाजता, तिसरी फेरी ६ जुलैला दुपारी ४.२० वाजता, तर चौथी शेवटची फेरी ७ जुलैला दुपारी ४.२० वाजता खामगाव येथून रवाना होऊन पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०५ मिनिटांनी पोहोचणार आहे. या एक्स्प्रेसला खामगाव येथून ६ जनरल बोगी, १ आरक्षित व १ एसएलआरची बोगी राहणार आहे, तर अमरावती येथूनही याच तारखांना ३ जनरल, ३ आरक्षित, १ एसी कोच, १ एसएलआर, अशा ८ बोग्या असलेली विठ्ठलदर्शन एक्स्प्रेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहे. अमरावती येथून या एक्स्प्रेसची निघण्याची वेळ दुपारी २ वाजताची राहणार आहे. अमरावती येथून जलंब येथे आल्यानंतर दोन्ही ठिकाणाच्या बोग्या जोडण्यात आल्यानंतर जलंब येथून १६ बोग्यांची विठ्ठलदर्शन एक्स्प्रेस ५.२० वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. नांदुरा येथे ५.५५, मलकापूर येथे ६.४० वाजता, तर पंढरपूर येथून परत येण्यासाठी या एक्स्प्रेसची पहिली फेरी ४ जुलै, दुसरी ५ जुलै, तिसरी १० जुलै, चौथी व शेवटची फेरी ११ जुलैला सोडण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस पंढरपूर येथून दुपारी ४ वाजता निघणार असून खामगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता, तर अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १०.४० वाजता पोहोचणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी वयाचा पुरावा सोबत बाळगावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.