आपल्या छंदांचे व्यवसायात रूपांतर करण्यात बॉलिवूड कलाकारांएवढे सराईत कोणी नाही याची खात्री सध्या अभिनया व्यतिरिक्त जे झटपट उद्योग त्यांनी सुरू केले आहेत यावरून लक्षात येईल. बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांनी अभिनयाबरोबरच स्वत:च्या निर्मितीसंस्था सुरू केल्या. आजघडीला प्रत्येकाची स्वत:ची कंपनी आहे मग त्याच्या आधारे अन्यही काही उद्योग सुरू करता येतील का?, याची चाचपणी करत संधी मिळताच तिथे उडी टाकण्याचा सपाटाच या कलाकारांनी लावला आहे. यात सध्या सर्वात पुढे नाव आहे ते फरहान अख्तर आणि अक्षय कुमारचे. फरहान स्वत: दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, गीतकार, गायक, लेखक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेला ‘कला’कार आहे. त्यामुळे आपलं प्रत्येक हुनर वापरून नवे उद्योग सुरू करण्याचा त्याने झपाटाच लावला आहे. त्यापाठोपाठ अक्षयने दोन चित्रपटनिर्मिती संस्था आधीच कार्यरत केल्यात. आता त्यातल्याच एका कंपनीच्या बॅनरखाली त्याने स्वत:चे असे फॅशन पोर्टल सुरू केले आहे. फॅशनशी सर्वात जास्त संबंध येतो तो अभिनेत्रींचा. सध्या फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर यांनीही आपल्या या फॅशनच्या छंदाला उद्योगाचे रुप देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत..
फरहानचे बॉलिवूड पोर्टल
फरहान अख्तर जेव्हा चित्रपटात नसतो आणि चित्रपटांची निर्मितीही करत नसतो तेव्हा तो देशभरात ठिकठिकाणी आपले म्युझिक कॉन्सर्ट करण्यात मग्न असतो. आता त्याने आपल्या एक्सेल एन्टरटेन्मेट बॅनरखाली नवे बॉलिवूड पोर्टल सुरू केले आहे. ‘फ्लिकबे’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पोर्टलवर समस्त चित्रपटकर्मी आपल्या चाहत्यांशी थेट आणि लगोलग संवाद साधू शकणार आहेत. सिंगापूरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पोर्टलवर इंडस्ट्रीच्या हरतऱ्हेच्या खबरा मिळणार आहेत पण, कमाल म्हणजे इथे कुठलेही गॉसिप दिसणार नाही. ही फरहानची खासियत! ‘आपल्यासारखेच छंद आणि आवडीनिवडी जोपासणाऱ्या माणसांबरोबर संवाद साधायला आपल्याला प्रत्येकाला आवडतं. फ्लिकबेच्या माध्यमातून जो समूह जोडला जाईल त्यांच्या संवेदना, त्यांचे विचार जाणून घेण्यातली गंमत न्यारी आहे त्यामुळे अशा एका वेगळ्या पोर्टलशी आपले नाव जोडणे जाणे हे आनंद देणारे आहे’, अशी भावना फरहानने व्यक्त केली आहे. याशिवाय, फरहानने आपल्याच ‘फुकरे’ या चित्रपटावर आधारित ‘फुक रे : रूफटॉप रनर’ नावाचा मोबाईल गेमही विकसित केला आहे.
अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दीचे फॅशन पोर्टल
अक्षय कुमारने ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’ बॅनरखाली अश्विनी यार्दीबरोबर स्वत:चे फॅशन पोर्टल सुरू केले आहे. ‘फोमो : फॅ शन ऑन माय ओन’ नावाने सुरू करण्यात आलेले हे पोर्टल खासकरून १५ ते ३४ वयोगटातील स्त्रियांसाठी तयार करण्यात आलेले आहे. स्त्रियांना नेहमी पार्लरमध्ये जाणे परवडणारे नाही. अशावेळी खास फॅशन टिप्स देऊ शके ल असे हे पोर्टल असून या पोर्टलच्या माध्यमातून एक मोठा महिलावर्ग ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’शी पर्यायाने अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दीशी जोडली जातील, असे मत अश्विीनीने व्यक्त केले आहे.
सोनम कपूरचा फॅशन ब्रॅंड
फॅशनच्या बाबतीत नेहमी प्रयोगशील असणाऱ्या सोनम कपूरनेही आपली बहीण रिया कपूरबरोबर हातमिळवणी करत स्वत:चा फॅशनब्रॅंड विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. सोनमच्या घरात अशाप्रकारचा उद्योग कोणी सुरू केलेला नाही त्यामुळे तिच्यासाठी ही वेगळी ओळख ठरणार आहे.
दीपिकाही झाली फॅशन डिझायनर..
‘मी फॅशनच्या बाबतीत खूप सजग आहे असे नाही. पण, कपडय़ांच्या बाबतीत आपण जे परिधान करू त्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब उमटते हे माझे ठाम मत आहे. मी ज्याप्रकारे फॅशन करते ते काही लोकांना आवडले. त्यातूनच ‘व्हॅन हुसेन’ या ब्रॅंडसाठी मी काही डिझाईन्स दिली आणि त्यातून माझे असे खास कलेक्शन बाजारात आले आहे’, असे दीपिकाने सांगितले. दीपिकाने ‘व्हॅन हुसेन’ या फॅशन ब्रॅंडसाठी खास कलेक्शन केले आहे. त्यानिमित्ताने ती पहिल्यांदाच फॅशन डिझायनर झाली आहे.