रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाल रुग्णांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या वताने एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. थेट रुग्णालयातच शाळा सुरू करून या मुलांना प्राथमिक शिक्षणासोबत संगीत, अभिनय आदींचे धडे देण्यात येणार आहेत. यामुळे उपचार घेत असलेल्या या चिमुरडय़ांच्या चेहऱ्यावर सध्या हास्य फुलले आहे. रुग्णालयातील बाल विभागात अपघात व इतर आजारांमुळे अनेक लहान मुले रुग्णालयात उपचार घेत असतात. त्याच प्रमाणे आईवडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने आणि घरात त्यांना लक्ष देण्यासाठी कोणीही नसल्याने पालकांना त्यांना रुग्णालयात सोबत ठेवण्याची वेळ येते. यामुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. त्याचबरोबर रुग्णालयातील वातावरणाचाही त्यांना कंटाळा येत असतो. मुलांची हीच अडचण लक्षात घेऊन मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या संकल्पनेतून रुग्णालयातच विशेष मोफत शाळा सुरू करण्यात आली आहे. अध्यापक महाविद्यालयातील प्राचार्या निवेदिता देशमुख व विद्यार्थी या मुलांना शिकविण्याचे काम करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. शाम मोरे यांनी दिली. चौकट दीड वर्षांपासून रुग्णालयात एका महिलेवर मोफत उपचार सुरू आहेत. या महिलेच्या चेहऱ्यावर तिच्या पतीने अ‍ॅसिड टाकल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या महिलेची पाच वर्षांची मुलगी अनिशा ही रुग्णालयातच आहे. तिचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी तिला शिकविण्याचे काम करतात. यातूनच मुलांसाठी रुग्णालयात शाळा असावी, ही संकल्पना पुढे आली. उपचारार्थी मुले किंवा रुग्णासोबत असलेल्या त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मोफत शाळा सुरू करणारे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय हे नवी मुंबईतील पहिलेच रुग्णालय आहे.