जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने नुकताच मानसिक आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाचा समारोप समारंभ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक मनोरुग्णालयात पार पडला. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभिषेक मामर्डे यांनी मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त समाजातील लोकांमध्ये मानसिक आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करावे, असे प्रास्ताविक भाषणातून सांगितले. या सप्ताहादरम्यान न्याय व विधि केंद्राची स्थापना, प्रश्नमंजूषा, स्मृतीभ्रंशता तपासणी शिबीर,  लघुनाटिका, बसस्थानकावरील मानसिक आरोग्य चित्र प्रदर्शन व व्यवसायोपचार विभागात मनोरुग्णांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम राबवण्यात आले. रुग्णांच्या नातेवाईकांना समुपदेशन करणे गरजेचे असून जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अल्का कुमार यांनी यावेळी व्यक्त केले. वयाच्या ६० वर्षांनंतर होणारे शारीरिक व मानसिक आजार, वयानुसार होणारे शारीरिक बदल हीसुद्धा विकासाची एक प्रकिया आहे, असे मनोविकृती तज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे यांनी सांगितले. त्यांनी वयाच्या ६०व्या वर्षांनंतर देण्यात येणाऱ्या लसीकरणाविषयीही माहिती दिली. वयोवृद्ध व्यक्तीची काळजी घेणे ही कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदारी आहे, असे उपअधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी म्हणाले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये यांनी अध्यक्षीय भाषणातून आरोग्य दिनाचे महत्त्व सांगितले. शैक्षणिक योग्यतेनुसार रुग्णांना पदवी उपलब्ध करून विविध अभ्यासक्रम पुनर्वसनाच्या दृष्टीने राबवण्यासाठी प्रकल्प हाती घेतलेले असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन रेखा शंभरकर यांनी केले. संध्या दुर्गे यांनी आभार मानले.