निरीक्षकाला उमेदवाराकडून धक्काबुक्की
जिल्हा काँग्रेसची अवस्था पक्षांतर्गत गटबाजीमुळे दयनीय झाली आहे. महापालिका निवडणुकीत तरी निदान ही स्थिती सुधारावी, अशी निष्ठावान काँग्रेसजनांची प्रतीक्षा असताना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक रामहरी रूपनवार यांना एका पदाधिकाऱ्याने धक्काबुक्की केली. महानगर अध्यक्षांना थप्पड लगावल्याच्या घटनेची पुनरावृत्ती येथे घडल्याने पक्षातील गटबाजी निवडणुकीच्या धामधुमीतही थांबण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराच्या रामेश्वर कॉलनी परिसरातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मंचावरच निरीक्षक रूपनवार यांच्याशी एक पदाधिकारी तसेच उमेदवाराने धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. या घटनेमुळे जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाटय़ावर आली आहे. राज्यमंत्री मुळक मंचावर येण्यापूर्वी आ. शिरीष चौधरी, माजी खासदास डॉ. उल्हास पाटील, निरीक्षक रामहरी रूपनवार, जिल्हाध्यक्ष उदय पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होऊन सभेला सुरुवात करणार होते. तोच अनपेक्षितपणे असा प्रकार घडला.
पक्षाच्या पंचायत राज सेलचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रभाग ३७ मधून निवडणूक लढवित असलेले विवेक ठाकरे अचानकपणे मंचावर आले आणि त्यांनी रूपनवार यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. अन्य नेते व पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. याआधी काँग्रेसचे महानगराध्यक्ष सलीम पटेल यांच्याही कानशीलात लगावण्याचा प्रकार एका इच्छुक महिला उमेदवाराकडून झाला होता. पटेल यांना भरसभेत झालेल्या मारहाणीचा चौकशी अहवाल कदाचित काँग्रेसकडे नुकताच पोहोचला असावा. हा अहवाल जातो न जातो तोच निरीक्षकांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
पटेल यांना मारहाण झाल्यावर हा पूर्वनियोजित प्रकार असल्याचे सांगून एका गटाने जिल्हाध्यक्ष हटावचा एककलमी कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाटय़ावर आल्याचे चित्र दिसत होते. आता घडलेल्या घटनेतही पुन्हा जिल्हाध्यक्षांना लक्ष्य केले जाते की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विवेक ठाकरे याच्याविषयी पक्षांतर्गत खल सुरू आहे. तथाकथित पत्रकार म्हणविणाऱ्या ठाकरेविरुद्ध फसवणुकीचे काही गुन्हे दाखल असून एरंडोल पोलिसात दाखल एका गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती.
वरणगावातील एका पतसंस्थेकडून लाखो रुपयांचे कर्ज घेताना ठाकरेने निंभोरा येथील तिसऱ्याच व्यक्तीच्या शेतीचा सातबारा उतारा तारण म्हणून देत फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळमध्ये गुन्हा दाखल आहे.
अशा व्यक्तीला काँग्रेसमध्ये थारा मिळतो कसा, पदाधिकारी म्हणून नेमणूक होते कशी आणि एवढेच नव्हे तर, महापालिका निवडणुकीत उमेदवारीही कशी दिली जाते, असे प्रश्न काँग्रेसजनांकडून उपस्थित केले जात आहेत.