स्वतंत्र विदर्भ देऊ असे काँग्रेसने कधीच आश्वासन दिले नाही, त्यामुळे वैदर्भीय जनतेचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून काँग्रेस नेते अजय माकन यांनी काँग्रेसच्या वैदर्भीय नेत्यांना तोंडघशी पाडले.
काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी बुधवारी विदर्भाबाहेरील नेत्यांकडे वेगळ्या विदर्भाची मागणी करणार नाही. त्याच्याशी आम्हाला देणघेणे नाही. आम्ही केवळ यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय नेतृत्त्वाकडे ठेवू, पक्षश्रेष्ठींचे या मुद्दय़ावर मत वळवू, असे म्हटले होते. माकन यांनी आज त्यांच्याच उपस्थितीत पत्रकार परिषदेत काँग्रेसने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले नाही. त्यामुळे विश्वासघात करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून मुत्तेमवार यांची गोची केली.
 या मुद्दय़ावर काल भरभरून बोलणारे मुत्तेमवार यांनी माकन यांच्या समोर गप्प बसणेच पसंत केले.
भाजप विदर्भाच्या मुद्दय़ाचे राजकारण करीत आहे. भाजप-शिवसेनेचे महाराष्ट्रात सरकार असताना त्यांनी वेगळा विदर्भ का केला नाही, असा सवाल करून ते म्हणाले, त्यावेळी शिवसेनेला दोष दिला जात होता. आता तर युती तुटली आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असे सांगत आहेत. भाजपच्या भुवनेश्वरमधील परिषदेतील ठराव असो वा अन्य ठिकाणची भाषणे भाजपने हा निवडणूक मुद्दा केला. भाजपने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यांनी जनतेला त्याचे उत्तर दिले पाहिजे, असेही माकन म्हणाले.
राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपाला मत
आघाडी तुटण्याला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरताना माकन यांनी भाजप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचे सांगून राष्ट्रवादीला मत देणे म्हणजे भाजपला मत देणे होय, असा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. पहिल्या बैठकीत आघाडी करण्याचे ठरवले होते. परंतु नंतर काँग्रेसच्या नेतृत्त्वाने फार प्रतिसाद न दिल्याने आघाडी तुटली असे विचारले असता ते म्हणाले, शरद पवार जसे सोनिया गांधी यांना भेटले. तशाच प्रकारे मोदींची पण त्यांनी भेट घेतली. मोदी यांच्या जवळ जाण्याचा शरद पवार सतत प्रयत्न करीत होते.
गडकरींना क्लिन चिट नाही
‘मोदी सरकार- वादा खिलाफी के १०० दिन’ असे शीर्षक असलेल्या पुस्तिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बनावट कंपन्या स्थापन करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात बोलताना माकन म्हणाले, त्यांना सर्व प्रकरणात क्लिन चिट मिळालेली नाही. काँग्रेसच्या पुस्तिकेतील आरोपा संदर्भात हवे असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, काँग्रेस त्याला योग्य उत्तर देईल.