महाराष्ट्रात पंधरा वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कपाळकरंटे सरकार आहे. आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात अंधाराचे साम्राज्य उभे करून भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याची टीका आ. अनिल कदम यांनी केली.
निफाड तालुक्यातील ओझर येथे भगवा सप्ताहातंर्गत ‘गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ या मोहिमेतंर्गत आयोजित  बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पगार होते. व्यासपीठावरील शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम गडाख, शामराव कदम, प्रदीप अहिरे, जगन्नाथ गवळी, दीपक कदम आदींनी विविध सूचना केल्या. तालुकाप्रमुख गडाख यांनी तळागाळात काम करणारे शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद असून शिवसैनिकांनी भगव्या सप्ताहात काँग्रेस आघाडीचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रकाश महाले यांनी केले. प्रास्तविक प्रकाश कडाळे यांनी केले. भगवा सप्ताहातंर्गत १५ जुलै रोजी सकाळी आठ वाजता सुकेणा गटाची बैठक सुकेणा सोसायटी सभागृहात तर, सायंकाळी पाच वाजता पिंपळस गणाची बैठक पिंपळस मारुती मंदिरात होणार आहे.