महानगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे शहर अध्यक्ष हरिश्चंद्र भोये यांनी महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी डॉ. वसुधा कुरणावळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासन परिपत्रकानुसार शासकीय, निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत अद्यापही खासगी संस्था किंवा आस्थापनेच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संबंधित परिपत्रकाबाबत अनभिज्ञ आहेत.
याबाबत संबंधितांना लेखी कळविण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मनपा शिक्षण मंडळ आस्थापनेवर नोव्हेंबर किंवा डिसेंबर २००१ मध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना डिसेंबर २०१३ अखेर १२ वर्षे पूर्ण होत असून संबंधित शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्याकामी कार्यवाही करण्यात यावी, विद्यार्थ्यांना शूज, सॉक्स, स्वेटर उपलब्ध करून द्यावेत, शिक्षकांचे वेतन महिन्याच्या एक तारखेस करण्यात यावे, केंद्र समन्वयकांची पदे पदवीधर शिक्षक सेवाज्येष्ठतेनुसार व आरक्षणानुसार भरावीत, २५ टक्के आरक्षणानुसार खासगी शिक्षण संस्थेत आर्थिक दुर्बल घटक व वंचित घटकांच्या पाल्यांना मोफत प्रवेश देण्याविषयी कार्यवाही करावी या मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाधिकारी डॉ. कुरणावळ यांनी संबंधित मागण्यांसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी राज्य संघटनेचे महासंघटक हिरामण चव्हाण, शहर सरचिटणीस किसन ठाकरे, कार्याध्यक्ष धर्मेंद्र बागूल, हिरामण बागूल आदींसह संघटना पदाधिकारी उपस्थित होते.