भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या(एलआयसी) स्थापनेला आज ५७ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त एलआयसीच्या विविध शाखांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आयुर्विमा क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी प्रवेश करून एक दशकापेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. मात्र, तरीही या क्षेत्रात एलआयसी अग्रक्रमावर असल्याचा दावा एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक आर. चंदर यांनी केला आहे. देशभरात एलआयसीचे २९ कोटीपेक्षा अधिक पॉलिसीधारक आहेत. गेल्या आर्थिक वर्षांत एलआयसीने ३७६.४२ लाख विमा पॉलिसींची विक्री केली. त्यातून ७६ हजार २४५ कोटी प्रथम वर्षीय हप्ता कंपनीला मिळाला. पेंशन आणि सामूदायिक विमा क्षेत्रात ३०४.६१ लाख आणि सामाजिक सुरक्षा आयुर्विमा योजनेद्वारा १३२.२४ लाख नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात आली. एकूण ८८ टक्के मृत्यू दाव्यांचा निपटारा १५ दिवसांच्या आत करण्यात आल्याचे आर.चंदर म्हणाले.
ग्राहकांसाठी संगणकप्रणाली उपयोगात आणणारी देशातील मोठी कंपनी आहे. विमाधारकांना हप्ता भरणे सोपे जावे म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड योजना सुरू करून विमाधारक देय तिथीला त्यांच्या म्युच्युअल फंड खात्यातून सरळ एलआयसीमध्ये भरू शकतात, अशीही सोय करण्यात आली. महामंडळाने अधिकृत बँकेचे एटीएम व एलआयसी क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही हप्ते भरण्याची सोय केली आहे. याशिवाय सामाजिक दायित्व निभावण्यातही कंपनीने मागे नाही. ‘एलआयसी गोल्डन ज्युबली फाउंडेशन’ची स्थापना गरीब, बेरोजगारीपासून सुटका, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि सामान्य माणसांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामागिरी बजावली आहे.
स्थापनेपासून फाउंडेशनने विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून २६२ प्रकल्पांतर्गत ३८.६५ कोटी रुपयांचे योगदान दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. एलआयसीने केलेल्या कामगिरीबद्दल रीडर्स डायजेस्ट, ट्रस्टेड ब्रांड अवार्ड, प्लानमेन मर्कोम पावर ब्रांड २०१३ अवॉर्ड, इन्स्टिटय़ुट ऑफ पब्लिक इंटरप्राईजेस अवॉर्ड इत्यादी २४ अवॉर्ड संपादित केले आहेत. यावेळी डावीकडून व्यवस्थापक के.एस. जोहर, व्यवस्थापक(विक्री) सुहास कांबळे, विपणन व्यस्थापक आर. देवगुप्ता, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक आर. चंदर, विपणन व्यवस्थापक मनोज पांडा आणि व्यवस्थापक(विक्री) एन.जी. देव यावेळी उपस्थित होते.