दिवंगत ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचे मराठी काव्यविश्वाशी अत्यंत जवळचे नाते होते. त्यांच्या जाण्याने मराठी कवितेचा ‘कालस्वर’ हरपला आहे, अशी भावना ज्येष्ठ समिक्षिका, कथाकार डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी शनिवारी मुंबईत दादर येथे व्यक्त केली.
कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात दिवंगत शंकर वैद्य यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. राजाध्यक्ष बोलत होत्या. मराठी कवितेच्या स्वरगंगेच्या काठावर बसून शंकर वैद्य आपल्याशी अजून कवितेबद्दल बोलताहेत, असे वाटत असल्याचे सांगून डॉ. राजाध्यक्ष म्हणाल्या, मराठी वृत्त आणि छंदांचे त्यांना अचूक ज्ञान होते. त्यांचा व्यासंग प्रचंड होता. वैद्य हे उत्तम आस्वादक, समीक्षक, अध्यापक आणि सुसंवादक होते.
‘कोमसापचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी शंकर वैद्य हे नव्या कवींची गलबते योग्य दिशेने जाण्यासाठीचे दीपगृह होते, असे सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा उषा तांबे म्हणाल्या, मी वैद्य सरांची विद्यार्थिनी. अत्यंत तन्मयतेने ते कविता शिकवायचे. मराठी भाषेचा सुक्ष्म विचार करणारे आणि भाषेबद्दल अत्यंत सजग असलेले असे हे व्यक्तिमत्व होते. ज्येष्ठ संगीतकार पंय यशवंत देव यांनी सांगितले, शंकर वैद्य हे अत्यंत प्रासादिक लिहिणारे होते. त्यांच्या कवितेत सखोल चिंतन दिसून येते. मीना प्रभू यांनी वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला तर अनुपमा उजगरे यांनी वैद्य यांच्या कवितेची वैशिष्टय़े सांगितली. नलेश पाटील, रवींद्र आवटी, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, कॅ. सुधीर नाफडे आदींनीही वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला.
संग्रहित लेख, दिनांक 7th Oct 2014 रोजी प्रकाशित
मराठी कवितेचा ‘कालस्वर’ हरपला
दिवंगत ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचे मराठी काव्यविश्वाशी अत्यंत जवळचे नाते होते. त्यांच्या जाण्याने मराठी कवितेचा 'कालस्वर' हरपला आहे, अशी भावना ज्येष्ठ समिक्षिका, कथाकार डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी शनिवारी मुंबईत दादर येथे व्यक्त केली.
First published on: 07-10-2014 at 06:13 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vijaya rajadhyakshs tributes to shankar vaidya