* केबल खराब होण्याचे प्रमाण वाढले
* नादुरूस्त केबल बदलण्यासाठी नवी केबल आणण्याचे नागरिकांनाच फर्मान
* डोंबिवली पश्चिमेला वीज रोज दोन-तीन तास खंडित
* वीज खंडित होताच नियंत्रण कक्षातील दूरध्वनी बंद
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होण्याचे प्रकार वाढू लागल्याने ठाणेकर हैराण झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. दरवर्षी पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर महावितरणकडून शहरातील विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येते. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरीही शहरातील वेगवेगळ्या भागांतील विद्युत केबल वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. या संदर्भात, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ठाणेकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरल्याचे दिसून येते. पाचपाखाडी येथील गणेशवाडी भागातील  नादुरुस्त केबल बदलण्यासाठी केबल उपलब्ध नाही, असे सांगत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ती नागरिकांना आणून देण्याचे फर्मान सोडले आहे. या प्रकारामुळे महावितरणच्या कारभाराविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून महावितरणकडून शहरातील वेगवेगळ्या भागांतील विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येते. तसेच शहरातील सर्व वाहिन्या सुस्थितीमध्ये आहेत का, याचीही चाचपणी करण्यात येते. मात्र, यंदा महावितरणच्या ढसाळ नियोजनाचा फटका ठाणेकरांना बसू लागला आहे. ठाणे शहर, वागळे इस्टेट, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आदी परिसरांत गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. सुरुवातीला पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर विद्युतवाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विद्युतपुरवठा खंडित होत असेल, असे ठाणेकरांना वाटत होते. मात्र जुलै महिना उजाडला तरीही विजेचा लपंडाव सुरू असल्याने ठाणेकरांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. गेल्या आठवडय़ामध्ये दिव्यात विद्युतवाहिन्यांचा धक्का लागून दोन मुलांना जीव गमवावा लागल्याने महावितरणचे अधिकारी काहीसे अडचणीत सापडल्याचे चित्र होते.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून पाचपाखाडी येथील गणेशवाडी भागातील एक वाहिनी वारंवार नादुरुस्त होत असल्याने परिसराचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. या संदर्भात, महावितरणकडे अनेक तक्रारी करूनही महावितरण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. नादुरुस्त वाहिन्या बदलण्यासाठी केबल उपलब्ध नाही, त्यामुळे ती केबल नागरिकांनी पैसे काढून आणावी, असा सल्ला त्यांच्याकडून देण्यात येतो, असे येथील रहिवाशी गोविंद पवार यांनी सांगितले. या संदर्भात महावितरणचे कनिष्ठ अभियंता संख्ये यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा देत नागरिकांना हा पर्याय सुचविला असल्याचे स्पष्ट केले. तसेच शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याविषयी ठाणे विभागाचे वरिष्ठ अभियंता कैलाश हुमने यांच्याकडे विचारणा केली असता, रस्त्यांच्या कामांमुळे तुटणाऱ्या विद्युतवाहिन्या दुरुस्तीमुळे वीजपुरवठा खंडित होतो. मात्र आता त्याचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवलीतील विजेचा लपंडाव सुरूच
मानपाडा येथील महावितरणची मुख्य वीजवाहिनी तुटल्याने डोंबिवली शहर परिसरात पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित झाला. रविवारी काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला असताना सोमवारी सकाळी पुन्हा एकदा काही तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे डोंबिवलीकर त्रस्त असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.  गेल्या महिनाभरापासून डोंबिवलीतील गोग्रासवाडी, रामनगर आणि पश्चिम भागातील वीज दररोज दोन ते तीन तास खंडित होत आहे. मानपाडा येथील १०० के. व्ही. वीजवाहिनीत बिघाड होत असल्याने हा प्रकार होत आहे. ही वीजवाहिनी सुमारे २० वर्षे जुनी आहे. या वीजवाहिनीची योग्य देखभाल, दुरुस्ती केली जात नसल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दरम्यान, दुरुस्तीच्या कामासाठी हा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, असे कार्यकारी अभियंता मशाळकर यांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेतील दहा क्रमांकाच्या फीडरवरून वाढत्या लोकवस्तीमुळे अधिक वीजवाहिन्या गेल्याने वाढीव दाबामुळे वीज प्रवाह खंडित होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नियंत्रण कक्षातील दूरध्वनी बंद केले जातात. ग्राहकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे डोंबिवलीकर नाराज आहेत.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity shortage in thane