कल्याण-डोंबिवली पालिकेत ई-निविदेचे धनादेश ठेकेदारांकडून प्रशासन स्वत:हून स्वीकारते. यामुळे पालिकेत वर्षांनुवर्षे निविदेचे व्यवस्थापन करणारे ठेकेदार नव्या ठेकेदाराला निविदेपासून वंचित ठेवणे, त्याला दमदाटी करणे असे प्रकार करतात. या प्रकारांमुळे चांगले ठेकेदार पालिकेत कामे करण्यास पुढे येत नाहीत. यासाठी ई-टेंडरिंग अनामत रकमेचे धनादेश इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरिंग सिस्टीम किंवा नेटबँकिंगद्वारे स्वीकारण्यात यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
गेले दोन दिवसांपूर्वी रस्त्यांच्या सिमेंटीकरणाच्या निविदा उघडण्यापूर्वी पालिकेत काही रिंगमास्टर ठेकेदारांकडून नवख्या ठेकेदारांना निविदेवरून दमदाटी केल्याचा प्रकार घडल्यामुळे हळबे यांनी प्रशासनाला हे पत्र दिले आहे. गेले २५ वर्षे पालिकेतील काही ठराविक ठेकेदार साखळी करून ठराविक कामे आपल्याच गोटातील कंत्राटदारास मिळतील अशी व्यवस्था करतात. बाहेरील नवखा ठेकेदार पालिकेत कामे घेण्यासाठी येणार नाही अशी व्यवस्था केली जाते. त्यामुळे पालिकेतील कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहते. अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे निर्माण झाल्यामुळे ठेकेदार निर्धास्त असतात. आपण कसेही काम केले तरी आपल्यावर कारवाई होणार नाही याची खात्री त्या ठेकेदारांना असते, असे हळबे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expectation for accepting e tender cheque by net banking