शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती, शेतकऱ्यांचे कर्ज माफ आणि कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी अनुदान, हा त्रिसुत्री कार्यक्रम मुख्यमंत्र्यानी राबवावा. अन्यथा, केंद्र आणि राज्य सरकारांची शेतकऱ्यांच्या प्रती असलेली भावना म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ ही म्हण सार्थ करणारी ठरेल, अशी प्रतिक्रिया विदर्भ जनआंदोलन समितीने व्यक्त केली आहे.
मराठवाडय़ातच नव्हे, तर देशातच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आणि तरीही सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांसाठी जगभरात प्रसिद्धीस आलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या दैन्यावस्थेचा आढावा घेऊन या आत्महत्या थांबाव्यात म्हणून उपाययोजनांची ब्ल्यू िपट्र तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, मंगळवारी यवतमाळला येत आहेत. या पाश्र्वभूमीवर या प्रतिक्रियेला विशेष महत्व आले आहे.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचा आढावा मुख्यमंत्री या आढावा बठकीत घेणार आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, २० मार्च २०१४ ला लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथील ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात ‘आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना त्याच्या मालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, असा हमी भाव देऊ’ असे आश्वासन दिले होते.
मोदी सरकारला या आश्वासनाचा विसर पडला. इतकेच नव्हे, तर असा हमी भाव देता येत नाही, याची कबुली देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा
आरोप विजसचे किशोर तिवारी यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांच्या निमित्ताने प्रशासनाची जोरदार धावपळ सुरू असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना काय असाव्यात, याबाबत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
आर्णी तालुक्यात ११५ आत्महत्या, पात्र फक्त ३३
आर्णी तालुक्यात २०१० पासून सुमारे ११५ शेतकऱ्यांनी, तर २०१५ मध्ये केवळ दोन महिन्यात ५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहेत. तालुक्यात सुमारे १०५ गावांचा समावेश असून ५९ गावातील शेतीच्या भरवशावर कुटुंबाचे पालन-पोषण होत नसल्याने कर्जापोटी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असले तरी आतापर्यंत ११५ पकी फक्त ३३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मदतीचा हात दिला आहे. इतर कुटुंबीय मात्र आजही शासकीय कार्यालयात चकरा मारत आहेत. या तालुक्यातील खेडमध्ये ९, दाभडीत ५ व जवळात ५ शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या असून आता त्यांच्याकरिता मुख्यमंत्री ‘अच्छे दिन’ येईल, अशी परिस्थिती निर्माण करतील, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस फुगत असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेणे व तसा ठोस पॅकेज मंजूर करावे, अशी अपेक्षा आहे. पालकमंत्री संजय राठोड, माजी मंत्री शिवाजराव मोघे आदि मंडळींनी दाभडी या गावाला भेट देऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे दुख जाणून घेतले. अवकाळी पावसामुळे रब्बी पिके हातातून निघून गेली आहेत.
‘मानवतेचा अजूनही वाहतो झरा’
स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलामुलींना सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची व्यवस्था ज्ञानज्योती परीक्षा केंद्राने केल्याची माहिती केंद्राचे संचालक प्रफुल्ल आणि प्रशांत भेदुरकर यांनी येथे वार्ताहरांना दिली. समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याच्या भावनेतून ही व्यवस्था करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व पुस्तके, अभ्यासिका आणि केद्रांचे ग्रंथालय विनामूल्य उपलब्ध राहील, असेही भेदुरकर बंधुंनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आणि संस्थाप्रमुख विशाल भेदुरकर यांच्या सेवाही या विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतील. ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा केंद्राचा हा उपक्रम म्हणजे ‘मानवतेचा अजूनही वाहतो झरा’ या उक्तीचा परिचय करून देणारा असल्याची प्रतिक्रिया आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2015 रोजी प्रकाशित
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘त्रिसूत्री’ कार्यक्रम राबवा
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती
First published on: 03-03-2015 at 07:07 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers suicide