आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थी, संस्थाचालकांत हाणामारीच्या प्रकारानंतर संस्थाचालकाने सुरुवातीची नोटीस घेतली नाही. त्यामुळे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याने या शाळेत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याच्यामार्फत संस्थाचालकाला नोटीस बजावली व आश्रमशाळा अखेर प्रशासनाने ताब्यात घेतली. आता संस्थाचालकाने यात लुडबूड करू नये, अशी तंबी देण्यात आली आहे.
हिंगोली तालुक्यातील लोहगाव फाटा येथील डॉ. श्रीराम पवार आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळेत सुविधा देण्यावरून संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून परस्पर गुन्हे दाखल झाले. हे प्रकरण जिल्हाभर गाजले. राज्य आदिवासी आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी करून अहवाल पाठविण्याचे कळविले. कळमनुरी येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी संस्थाचालकास बुधवारी नोटीस बजावली. तसेच पथकही त्याच्या घरी पाठविले. शाळा पूर्ववत चालू करून विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात, नसता आश्रमशाळेला प्राप्त होणाऱ्या अनुदानातून होणारा खर्चाचा निधी वजा करण्यात येईल, असे नोटिशीत बजावले होते.
मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्हाला शाळा सुरू करण्यात स्वारस्य नाही. आम्ही शाळा चालविण्यास असमर्थ असून विद्यार्थ्यांच्या हातात शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र द्या व शाळा बंद करा, असे पदाधिकाऱ्यांनी सांगत नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासनाने मुख्याध्यापक पी. आर. राठोड यांना ही नोटीस दिली. मात्र, आपल्याला शाळा सुरू करण्याबाबत संस्थेकडून कुठल्याही सूचना नाहीत. त्यामुळे आपण काही करू शकत नाही. आजारी असल्याचे राठोड यांनी सांगितले.
आदिवासी प्रकल्प कार्यालयाने ही बाब अमरावती येथील अतिरिक्त आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आणली. या कार्यालयाने ही संस्था ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून प्रकल्प अधिकारी धाबे यांनी शाळा ताब्यात घेतली. विद्यार्थ्यांच्या भोजनाची गरसोय होऊ नये, या साठी िपपळदरी आश्रमशाळेतून धान्य घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आश्रमशाळेतील ज्येष्ठ शिक्षक डी. के. श्रीमंगले यांची प्रभारी मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली. सायंकाळी श्रीमंगले यांच्यामार्फत गुरुवारी संस्थाचालकास नोटीस बजावली. प्रशासनाने आश्रमशाळा ताब्यात घेतली असल्याचे कळविले. संस्थाचालकाने प्रशासकीय कामात अडथळा करू नये, असा लेखी इशारा देण्यात आला.
दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. राठोड यांनी प्रशासनाची नोटीस घेण्यास दोन वेळा नकार दिला. संस्थाचालकांनी तसे आपणास अधिकार दिले नसल्याचे सांगत शाळेत येऊन ती सुरू करण्याबाबत असमर्थता दाखविली. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी धाबे यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2014 रोजी प्रकाशित
आश्रमशाळेचा ताबा अखेर प्रशासनाकडे!
आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थी, संस्थाचालकांत हाणामारीच्या प्रकारानंतर संस्थाचालकाने सुरुवातीची नोटीस घेतली नाही. त्यामुळे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याने या शाळेत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याच्यामार्फत संस्थाचालकाला नोटीस बजावली व आश्रमशाळा अखेर प्रशासनाने ताब्यात घेतली.

First published on: 03-01-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight in student organization member in hermitage school education hingoli